खासदार बजरंग सोनवणेंची जीभ घसरली; थेट पत्रकारांच्या बायका-पोरांचा केला उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 08:11 PM2024-12-03T20:11:02+5:302024-12-03T20:11:19+5:30
याबाबत पत्रकारांमधून सोनवणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
बीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपशेल अपयश आले. सहापैकी महायुतीच्या पाच तर आघाडीला केवळ एकच जागा मिळाली. हे अपयश पचवता येत नसल्याने पहिल्यांदा खासदार झालेल्या बजरंग सोनवणे यांची जीभ घसरू लागली आहे. बीडमधील एका सत्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी पत्रकार, त्यांच्या बायका, पोरांना संशय आहे का? असे म्हणत खालच्या पातळीला जावून टीका केली. याबाबत पत्रकारांमधून सोनवणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे.
पहिल्यांदाच खासदार झालेल्या बजरंग सोनवणेंची पत्रकारांबाबत जीभ घसरली: पत्रकारांच्या बायका-पोरांचा केला उल्लेख pic.twitter.com/U4ryZv69Nh
— Lokmat (@lokmat) December 3, 2024
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे मैदानात होत्या. यावेळी जातीय राजकारण झाले, शिवाय जरांगे फॅक्टरही चालला. यात सोनवणे यांचा निसटता पराभव झाला. आता सोनवणे विधानसभेतही आपला करिश्मा दाखवतील, असे सर्वांनाच वाटत होते. खासदार असल्याने त्यांच्याच नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. परंतु मविआचा बीड वगळता एकाही ठिकाणी उमेदवार विजयी झाला नाही. उलट परळीत मविआचा उमेदवार विक्रमी मतांनी पराभूत झाला.मविआच्या याच अपयशावर पत्रकारांनी लिखाण केले होते. तसेच सोनवणे हे केज मतदारसंघात शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा अर्ज दाखल करताना गैरहजर होते. याची चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याने लिखाण केले होते. यामुळेच सोनवणे यांचा तिळपापड झाला. रविवारी बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना सोनवणे यांनी मनातील खदखद व्यक्त करताना पत्रकारांवर खालच्या स्तरावर जावून टीका केली. निकालानंतर माझ्यावर संशय व्यक्त केला. त्यावरूनच सोनवणे यांची जीभ घसरली. या वक्तव्यानंतर सोनवणे यांच्यावर सर्वस्तरातून टीका होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, पत्रकारांबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी खासदार सोनवणेंवर जिल्ह्यातील पत्रकार वर्गातून चौफेर टीका होत होती. वाद वाढल्यानंतर आज अखेर सोनवणे यांनी निवेदन जारी करत झालेल्या प्रकराराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.