बाळासाहेब आंबेडकर पोहचले आष्टी डीवायएसपी कार्यालयाला टाळे ठोकण्यास; पोलिस म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 06:10 PM2023-10-28T18:10:15+5:302023-10-28T18:11:29+5:30
पिडीत महिलेला न्याय देऊन दोषी आरोपीला तात्काळ अटक करा- बाळासाहेब आंबेडकर
- नितीन कांबळे
कडा (बीड): आदिवासी पिडितेला न्याय देऊन आरोपींना तात्काळ अटक करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. याप्रकरणी कारवाईत दिरंगाई होत असल्याने अॅड.आंबेडकर यांनी आज आष्टी येथील उपविभागीय पोलिस कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन केले याप्रसंगी ते बोलत होते.
आष्टी तालुक्यातील वाळुंज येथील आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे आष्टीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन आज दुपारी अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले. पुढे बोलताना अॅड.आंबेडकर म्हणाले की, सत्तेचा दुरुपयोग होत आहे. पीडितेने सांगितलेले आरोपी पोलिसांनी पहिल्यांदा पकडावे. मी पोलिसाच्या विरोधात नाही, फक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आहेत हे दाखवून देण्यासाठी आलो आहे. कोणत्याही महिलेला नग्न करण्याचा, व कोणाच्याही शेतातील उभे पिक नष्ट करण्याचा अधिकार कोणालाही नाही. घडलेली घटना लाजिरवाणी आहे. यामुळे या प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पोलिसांनी तीन दिवसांत पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले. आंदोलनात मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे,जिल्हाध्यक्ष उध्दव खाडे, प्रा.किसन चव्हाण, प्रा.अरूण जाधव, शैलेश कांबळे,बबन वडमारे, अजय सरोदे, रूपेश बोराडे, बापु आहेर,आकाश कांबळे,याच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते