जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये इतरांच्या प्रवेशास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:34 AM2021-04-01T04:34:07+5:302021-04-01T04:34:07+5:30
बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या सूचनेनुसार बीड ...
बीड : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेल्या सूचनेनुसार बीड जिल्हा परिषदेत व पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी व अभ्यागतांच्या व्यतिरिक्त इतर अभ्यागतांच्या प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ३१ मार्च रोजी सर्व खातेप्रमुखांना याबाबत कळवून तसे आदेश जारी केले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कार्यालयांतर्गत येणाऱ्या लोकप्रतिनिधी व अति तातडीच्या कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांशिवाय इतर अभ्यागतांना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. मात्र, विभागप्रमुख व गटविकास अधिकाऱ्यांना तातडीच्या व महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करावयाचे असल्यास निमंत्रितांना, अभ्यागतांना पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सीईओंनी दिले आहेत. असे पास वितरित करण्याची जबाबदारी जिल्हा स्तरावर बैठकीचे आयोजन करणारे विभाग प्रमुख, तर तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांची असेल, अशा सर्व बैठकीवेळी कोविड -१९ साथरोग संबंधित सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे व दिशा निर्देशांचे पालन करणे अनिवार्य राहील, असे आदेशात नमूद आहे.
प्रवेशद्वारावर टपालपेटी
अभ्यागतांना प्रवेश बंदी असली तरी त्यांचे पत्रव्यवहाराच्या सुविधेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर टपालपेटी ठेवण्यात येत आहे. अभ्यागतांनी या टपालपेटीचा कार्यालयीन वेळेत पत्रव्यवहारासाठी उपयोग करावा, तसेच त्यांना बीड जिल्हा परिषदेच्या इमेल आयडीवरसुध्दा पत्रव्यवहार करता येईल. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीशिवाय इतर ठिकाणी भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विभागांनी व पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनीदेखील पत्रव्यवहारासाठी अशी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत या आदेशाद्वारे सूचना करण्यात आल्या आहेत.