मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात बंद, बाजारपेठेत शुकशुकाट
By अनिल भंडारी | Published: February 14, 2024 06:58 PM2024-02-14T18:58:47+5:302024-02-14T18:58:59+5:30
माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तर आठवडी बाजार असतानाही वडवणीत उत्स्फूर्त बंद पाळला.
बीड : राज्य शासनाने विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयऱ्यांबाबत कायदा तयार करावा, या मागणीसाठी १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला बुधवारी जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला.
केज, आष्टी, कडा, गेवराई, अंबाजोगाई, पाटोदा, बीड, परळीधारूर, वडवणी शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठ व सर्वच प्रकारची दुकाने बंद होती. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. माजलगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रॅली काढण्यात आली तर आठवडी बाजार असतानाही वडवणीत उत्स्फूर्त बंद पाळला. दरम्यान १३ फेब्रुवारी रोजी रात्री ३७ (१) (३) कलम लागू करून २७ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश प्रशासनाने काढला होता. याची माहिती पोलिस व्हॅनद्वारे दिली जात होती.