दरोडेखोरांचा केरूळ येथे धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 01:39 PM2024-07-30T13:39:29+5:302024-07-30T13:40:39+5:30

धारदार शस्त्राने वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे

Bandits rampage in Kerula; Cash along with jewelery looted, two seriously injured | दरोडेखोरांचा केरूळ येथे धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास, दोघे गंभीर जखमी

दरोडेखोरांचा केरूळ येथे धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास, दोघे गंभीर जखमी

- नितीन कांबळे
कडा ( बीड) :
केरूळ येथील भागवत वस्तीवर आज पहाटे १ वाजेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेली. प्रतिकार केल्याने दरोडेखोरांच्या मारहाणीत दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवरील राजू भागवत व दादा भागवत याचं एकत्रित कुटुंब आहे. सोमवारी रात्रीचे जेवण झाल्यानंतर दादा भागवत हे पत्नी व आईसह घरासमोरील पडवीत झोपले होते. तर राजू भागवत पत्नी, बहिण, भाची घरात झोपले होते. मंगळवारी पहाटे एक वाजेच्या दरम्यान पाच ते सहा दरोडेखोर तिथे आले. त्यांनी समोरील घराची बाहेरून कडी लावत बाहेरील सर्वांना मारहाण सुरू केली.  गडबड गोंधळाचा आवाज येताच राजू हा पाठीमागच्या दाराने बाहेर आला. यावेळी दरोडेखोर आणि राजू यांच्या झटापट सुरू झाली. प्रतिकार करणाऱ्या राजूवर धारधार शस्त्राने वार करत जखमी केले. तसेच दादा भागवत याला देखील मारहाणीत मुक्कामार लागला. याच दरम्यान काही दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून महिलांच्या अंगावरील सोने हिसकावले. तसेच घरात इतर ठिकाणी ठेवलेले सोनेचांदीचे दागिने आणि रोख रक्कम ताब्यात घेतली. 

दरोडेखोरांनी डोक्यावर, पाठीवर, पोटावर, मानेवर वार केल्याने राजू गंभीर जखमी झाले आहेत. तर भाऊ दादा भागवत हा देखील जखमी आहे. झटापटीत गंभीर जखमी झालेल्या राजू भागवत यांच्यावर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोन्यासह रोख रक्कम असा एकूण किती ऐवज चोरीला गेला याची अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही. घटनास्थळी आष्टीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, पोलीस हवालदार थोरवे, पोलीस अंमलदार सचिन गायकवाड, दिपक भोजे यांनी पाहणी केली. तसेच बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

Web Title: Bandits rampage in Kerula; Cash along with jewelery looted, two seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.