बांगडीच्या धंद्याला आली मंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:32 AM2021-05-14T04:32:56+5:302021-05-14T04:32:56+5:30
शिरूर कासार : लग्न सराई, यात्रा, जत्रा, बाजार आदिंसह सर्व सण, उत्सव कोरोना महामारीने बंद झाले असून, यावेळी ...
शिरूर कासार : लग्न सराई, यात्रा, जत्रा, बाजार आदिंसह सर्व सण, उत्सव कोरोना महामारीने बंद झाले असून, यावेळी चालणाऱ्या बांगडीच्या धंद्यावर मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे किरकोळ बांगडी व्यावसायिक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सौभाग्याचे लेणं समजले जाणाऱ्या बांगडीला आता अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. बांगडी भरताना ग्राहकाशी थेट जवळून संबंध येत असल्याने हा व्यवसाय बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी बांगडी भरणारे किरकोळ व्यायसायिक आर्थिक कोंडीत सापडले आहेत.
अक्षय तृतीयेला हापूस, केशरचा बेत
शिरूर कासार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजली जाणारी अक्षय तृतीया शुक्रवारी असून, या दिवशी पितृभोजनाची परंपरा घरोघरी सांभाळली जाते. प्रामुख्याने आमरसाचे जेवण हाच बेत जवळपास निश्चित असतो. दिवसेंदिवस गावरान आंबे आता दिसेनासे झाले असून, त्याची जागा केशर, हापूस, पायरी अशा आंब्यांनी घेतली आहे. अक्षय तृतीयेचे दिवशीसुध्दा पितृ नैवेद्यासाठी व त्यानिमित्ताने सर्वांनाच या आंब्याचा रसास्वाद चाखता येणार आहे.
त्यांची होते मजा, शेतकरी भोगतोय सजा
शिरूर कासार : लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून मद्यपी शेतातील झाडांच्या सावलीखाली मजा मारत आहेत. मात्र, रिकाम्या बाटल्या उचलण्याची सजा बिचारा शेतकरी भोगतो आहे. या बाटल्या उचलल्या नाहीत तर पुढे शेतमशागतीच्या वेळी पेरणी, खुरपणी करताना फुटलेल्या बाटल्यांच्या काचा दुखापतीस कारणीभूत ठरतील म्हणून शेतकरी या बाटल्या रोजच वेचून बाहेर फेकतो आहे. शेतकऱ्याच्या गैरहजेरीत हे हौशी मद्यपी झाडाखाली तळ ठोकतात आणि ते सर्व निकामी झालेले साहित्य तिथेच टाकून जातात .
पुन्हा कोरोनाने मारली उसळी
शिरूर कासार : गेले तीन दिवस कोरोना बाधितांचा आकडा खाली येत असल्याने काहिसा दिलासा मिळत असतांनाच बुधवारी मात्र कोरोनाने उसळी मारली. तालुक्यात कालचा आकडा एकदम १४१वर गेल्याने पुन्हा एकदा तालुक्याच्या धुकधुकीत वाढ झाली आहे.
कोरोनाचा भडका आणि महागाईचा जाळ
शिरूर कासार : एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटला तरी महामारीचे हे शुक्लकाष्ठ अजूनही संपत नाही. उलटपक्षी कोरोनाचा मोठा भडका होत आहे. त्यातच महागाईचा जाळ होत असल्याने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. कोरोनामुळे बाहेर पडू नका. असा सल्ला वारंवार दिला जातो. मात्र, घरात राहून खाणार काय? हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. कोरोना आणि महागाईची मिलीभगत जगणे त्रासाचे करून सोडत आहे .