बीडमध्ये बंजारा समाजाचा दणका मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:14 AM2019-02-19T00:14:48+5:302019-02-19T00:16:09+5:30
बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजातील इयत्ता नववीतील स्वाती राठोड हिने आपली जीवन यात्रा संपविली. यातील आरोपीला कठोर ...
बीड : सततच्या छेडछाडीला कंटाळून बंजारा समाजातील इयत्ता नववीतील स्वाती राठोड हिने आपली जीवन यात्रा संपविली. यातील आरोपीला कठोर शासन व्हावे आणि लेकी-बळीच्या संरक्षणमिळावे यासाठी बंजारा या समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट दणका मोर्चा काढण्यात आला. यात ‘उठ तांडो ला दांडो, अन्याय कारेवाळेर फोड मुंडो’ या घोषणेने परिसर दणाणला.
ना पक्षासाठी, ना नेत्यांसाठी, रस्त्यावर आलोय लेकींच्या संरक्षणासाठी या मुद्यावर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधव दाखल झाला. आपल्या लेकीवर झालेल्या अन्यायामुळे संतापलेल्या समाजाने प्रशासनवर विश्वास ठेवत छत्रपती शिवाजी स्टेडियमपासून शांततेच्या मार्गाने मोर्चाला सुरु वात केली. यावेळी बंजारा बांधवांनी घोषणाबाजी करत अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी पुतळ्याला हार घालून प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे वक्त्यांनी व्यवस्थेबद्दल असलेला समाजाचा रोष भाषणातून व्यक्त केला.
जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला आता शांत बसायची वेळ संपली. आतापर्यंत झालेले अन्याय अत्याचार सहन केले पण आज आम्ही आमच्या लेकीसाठी रस्त्यावर आलो आहोत. आज शांततेत मोर्चा केला आहे. परंतु प्रशासन यावरही दाखल घेत नसेल तर आता शांततेत मोर्चा होणार नसल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात बंजारा बांधव व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.