बँकेवरील दरोड्याचा ‘प्लॅन’ फसला; अट्टल दरोडेखोरांच्या बीडमध्ये आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:53 PM2018-06-13T16:53:10+5:302018-06-13T16:53:10+5:30
लॉकर व गेट तोडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आष्टी येथील बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पर्दाफाश केला.
बीड : लॉकर व गेट तोडण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन आष्टी येथील बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. आठ पैकी चार दरोडेखोरांच्या सापळा लावून मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, आष्टी व अंमळनेर पोलिसांनी जामखेड-आष्टी मार्गावर केली. यातील दोन दरोडेखोर हे मध्यप्रदेशचे असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आठवड्यापूर्वीच एटीएम चोरीचा प्रयत्न फसला होता.
अमित शंकर चव्हाण (२७), गट्टू मोहन काळे (२८ दोघे रा.भोपाळ, मध्यप्रदेश), नितीन धनसिंग पवार (२९) व किशोर लाख पवार (२९ दोघे रा.जामखेड) अशी पकडलेल्या चार अट्टल दरोडेखोरांची नावे असून आणखी चार दरोडेखोर अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून पलायन करण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
अशी झाली कारवाई
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कोंबीग आॅपरेशन करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना दिल्या. त्यांनी अंमळनेर व आष्टी पोलिसांना सोबत घेऊन आष्टी तालुक्यात नाकाबंद केली. याचवेळी पाळवदे यांना जामखेडहून एका जीपमधून (एमएच १६ आर ३४९५) काही दरोडेखोर आष्टीच्या दिशेने जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्याप्रमाणे सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्याच्या सुचना दिल्या. तर गुन्हे शाखेची जीप जामखेडमध्ये थांबली. जामखेड शहरातून दरोडेखोरांची जीप बाहेर पडताच आणि त्यात दरोडेखोर असल्याची खात्री पटताच पाळवदेसह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. पोलीस आपला पाठलाग करीत असल्याचे समजताच दरोडेखोरांनी आपली जीप सुसाट पळविली. अखेर चार कि़मी.पर्यंत पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी त्यांची जीप आडविली आणि त्यांनी पलायन करण्यापूर्वीच त्यांच्या मुसक्या आवळल्या.
या सर्वांना आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, आष्टीचे पोनि सय्यद शौकत, अंमळनेर ठाण्याच्या सपोनि विशाखा धुळे, सपोनि अमोल धस, तुळशीराम जगताप, बालाजी दराडे, मुंजा कुव्हारे, सखाराम सारूक, विकास वाघमारे, प्रसाद कदम, नरेंद्र बांगर, मोहन क्षीरसागर, महाजन, आष्टी, अंमळनेर ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.
आठवड्यात दुसरी टोळी जेरबंद
सोमवारी रात्री पकडलेले दरोडेखोर हे आष्टी येथील बँकेवर दरोडा टाकण्यासाठी निघाले होते, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे बँकेवरील दरोडाही वाचला आणि दरोडेखोरांची टोळीतील चार जण जेरबंद झाली. आठवड्यापूर्वीच राजुरी येथील एटीएम मशीन लंपास करण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे फसला होता. यामध्येही पाच जणांची टोळी पकडली होती. आठवड्यात ही दुसरी मोठी कारवाई आहे.
जीपसह साहित्य जप्त
दरोडा टाकण्यासाठी वापरलेली जीप पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच कटर, लोखंडी तीन रॉड, टांबी, हतोडा, कटावणी, मारतूल असे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मेव्हणे-मेव्हणे, एकमेकांचे पाहुणे
अमित चव्हाण याची बहिण किशोर पवारची पत्नी आहे. ते दोघे नात्याने मेव्हणे आहेत. याच नात्याने सर्वांना एकत्र केले आणि दरोडेखोरांची टोळी बनली. त्यानंतर हे सर्व एकमेकांचे मेव्हणे-मेव्हणे झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकमेकांचे पाहुणे असल्याने सर्व जण मिळून मिसळून दरोडा टाकत असल्याचे तपासातून समोर आले आहे. हे सर्व आरोपी अट्टल असून त्यांनी महाराष्ट्रासह राज्याबाहेरही अनेक गुन्हे केल्याचे सांगण्यात येते. पोलिसांकडून त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, याचा शोध घेतला जात आहे.