बापरे...! गायीच्या पोटात वासरू अन् ४० किलो प्लास्टिक, कोंडवाड्यात गर्भवती गायीचा मृत्यू
By सोमनाथ खताळ | Published: August 5, 2024 03:50 PM2024-08-05T15:50:41+5:302024-08-05T15:55:01+5:30
गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मृत्यूने प्लाास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बीड : बीड शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याच जनावरांना पकडून नगर पालिकेच्या पथकाने कोंडवाड्यात ठेवले. यातच पाच महिन्यांची गर्भवती असलेली गाय मृत झाली. तिचे शवविच्छेदन केले असता तिच्या पोटात वासरू अन् तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. हा प्रकार रविवारी समोर आला. गायीचा मृत्यू प्लास्टिकमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मृत्यूने प्लाास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
बीड शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ जुलै २०२४ पासून मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. या पथकाने शहरात फिरणाऱ्या जवळपास ५० मोकाट जनावरांना पकडून खासबाग व नेहरू नगर भागातील कोंडवाड्यात ठेवले. कोंडवाड्यात असतानाच एका गायीचा मृत्यू झाला. पथकाने ही माहिती बीड शहर पोलिसांना कळवली. पोलिसांनी पशुधन विकास अधिकाऱ्यांना पत्र दिल्यावर तिचे कोंडवाडा परिसरात शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी ही गाय जवळपास पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. तसेच, तिच्या पाेटात तब्बल ४० किलो प्लास्टिक निघाले. डॉक्टरांनी सर्व सॅम्पल घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे कारण अधिकृतरीत्या समोर येणार आहे, परंतु प्राथमिकदृष्ट्या प्लास्टिक पोटात राहिल्यानेच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाेटात प्लास्टिक कसे जाते?
शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना खाण्यासाठी चारा नाही. त्यामुळे ते कचरा कुंडी व रस्त्यावर पडलेले पदार्थ खातात. अनेकदा काही लोक घरातील कचरा, अन्न पदार्थ व इतर साहित्य हे प्लास्टिक कॅरीबॅगमध्ये गुंडाळून फेकतात. जनावरांना ते तोंडाने वेगवेगळे करता येत नसल्याने ते प्लास्टिकसह खातात. यामुळे ते पोटात जाते. ते बाहेर येत नसल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळून जनावरांचा मृत्यू होताे. यापूर्वीही तीन ते चार वर्षांपूर्वी बीड शहरातील शाहूनगर भागातील गायीचा प्लास्टिकमुळेच मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते.
नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले
पोलिसांचे पत्र मिळाल्यावर कोंडवाड्यात जाऊन गायीचे शवविच्छेदन केले. यामध्ये ती जवळपास पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. तसेच, तिच्या पोटात ३० ते ४० किलो प्लास्टिक निघाले आहे. सर्व सॅम्पल घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.
- डॉ. विजय चौरे, पशुधन विकास अधिकारी, बीड.
एका गायीचा मृत्यू झाला
मोकाट गुरे पकडण्यासाठी २५ जुलैपासून माझ्यासह पाच जणांचे पथक नियुक्त केले आहे. आम्ही ५० जनावरे पकडून कोंडवाड्यात ठेवली होती. यातच एका गायीचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून नाळवंडी रोड परिसर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इतर जनावरे हे पावसामुळे निवाऱ्याची सोय नसल्याने मालकांकडून हमीपत्र घेऊन सोडण्यात आले.
- मुन्ना गायकवाड, पथकप्रमुख, नगर पालिका, बीड.