परळी गोळीबारानंतर बनवाबनवीची ‘स्टोरी’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:55 AM2017-11-20T00:55:17+5:302017-11-20T00:57:05+5:30
बीड / परळी / अंबाजोगाई : परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारातील शेतात देविदास प्रल्हाद मुंडे (२५) या युवकावर शनिवारी गोळी झाडल्याची घटना घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. घटनेला दोन दिवस होऊनही रविवारी सायंकाळपर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झाली नव्हती. जखमी देविदास मुंडेवर अंबाजोगाईच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जखमी हा खरी माहिती लपवत असून वेगवेगळ्या ‘स्टोरी’ बनवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे घटनेचे मुख्य कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
देविदास मुंडे याच्यावर अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात शनिवारी रात्री शस्त्रक्रिया करुन खांद्याजवळ लागलेली गोळी काढण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी पोलिसांनी त्याची वैयक्तिक भेट घेऊन चौकशी केली असता त्याने वेगवेगळे कथानक रचून तपासात असहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला त्याने आपल्यावर झालेला गोळीबार गुटख्यातूनच केलेला आहे असा संशय व्यक्त केला आहे. अनेकांची नावेही त्याने घेतली.
दुपारनंतर पहिली स्टोरी बंद करुन त्याने कोणाकडून तरी मिसफायर होऊन आपल्याला गोळी लागल्याचे कथानक समोर आणले. वास्तविक पाहता ही सर्व बनवाबनवीची उत्तरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने तपासास सुरुवात केली. सहायक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु तेथे काहीच मिळाले नाही. देविदास मुंडेवर गोळी झाडली की मिसफायर झाले याबाबत ठोस असा पुरावा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे तपासाला अद्याप दिशा मिळाली नाही.
प्रकरण गुंतागुंतीचे : पोलीस तपासात व्यस्त
पोलिसांच्या म्हणण्यानुसार जखमी हा खरी माहिती लपवित आहे. देविदास मुंडेसह इतर तिघे शुक्रवारी रात्री पार्टीसाठी बाहेर गेले होते. तेथेच कोणाकडून तरी मिसफायर होऊन देविदास मुंडे याला पाठीमागून गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खरे कारण शोधण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांनी आपली पथके कामाला लावली आहेत.
मोबाइल तपासणीसह मित्रांची चौकशी
देविदास मुंडे ज्या मित्रांसोबत पार्टीला गेला होता त्यांची माहिती काढण्याबरोबरच मोबाइलचे कॉल डिटेल्स् पोलिसांकडून काढले जात आहेत. तसेच रुग्णालयात भेटायला येणाºयांकडूनही माहिती घेतली जात आहे.