उपचारात अडथळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:29 AM2021-01-17T04:29:18+5:302021-01-17T04:29:18+5:30
रस्त्यांची दुर्दशा सिरसाळा : येथील जिनिंगच्या पाठीमागील परिसरात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना, वाहनधारकांना कसरत करतच रस्ता पार करावा ...
रस्त्यांची दुर्दशा
सिरसाळा : येथील जिनिंगच्या पाठीमागील परिसरात खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना, वाहनधारकांना कसरत करतच रस्ता पार करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या समस्येकडे दुर्लक्ष झाले असून, स्वच्छता होत नसल्याने आजार बळावण्याची शक्यता आहे.
पाणी सुरळीत पुरवा
बीड : शहराला पाणीपुरवठा करणारी बिंदुसरा व माजलगाव ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. असे असताना दहा ते बारा दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शहरातील विविध भागातील नागरिकांमधून केली जात आहे.
वाहनधारकांना रस्त्यावरील बाभळीचा अडथळा
गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी बाभळीचा वेढा वाढल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या झाडांच्या खाली आलेल्या फांद्या व काटे ओरबडत असल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या फांद्या तसेच बाभळी तोडण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.
रॉकेलचा गैरवापर
गेवराई : गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरील रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनांसाठी केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे. तर दुसरीकडे शिधापत्रिकाधारकांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परंतु महसूल प्रशासनाकडून याकडे लक्ष न दिल्यामुळे गैरवापर सुरूच आहे.