राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांचे थेट धनंजय मुंडेंच्या परळीत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 12:39 PM2021-12-25T12:39:04+5:302021-12-25T12:44:20+5:30
बार्टीतर्फे देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- २०१८ एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्याची आंदोलकांची मागणी
परळी ( बीड ) : बार्टीतर्फे ( BARTI ) देण्यात येत असलेली अधिछात्रवृत्ती- २०१८ एमफिल ते पीएचडी पाच वर्षांसाठी नियमित करण्यात यावी, या मागणीकरिता राज्यातील विविध विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांचा विधानसभा मतदारसंघ परळी वैजनाथ येथे शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. याबद्दल सातत्याने मंत्री मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचा संताप आंदोलक विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग भारत सरकारच्या नियमाप्रमाणे एम.फिल. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना सलग पाच वर्षे पीएच. डी. पर्यंत फेलोशिप देण्यात येते. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) च्या माध्यमातुन देण्यात येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) मात्र एम.फिल. या अभ्यासक्रमासाठी दोनच वर्षे दिली जात आहे. पीएच.डी. पर्यंत सलग अधिछात्रवृत्ती देण्यात येत नसल्याने संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागेल. यामुळे अनुसूचित जातीच्या संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) धारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून अनेक जण पीएचडी संशोधनापासून वंचित राहत आहेत. ही त्रुटी दूर करावी यासाठी बार्टी तसेच सामाजिक न्याय मंत्र्यांकडे सातत्याने संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF – २०१८) धारक विद्यार्थी पाठपुरावा करत आहेत. परंतु, मागणी मान्य होत नसल्याने हे संशोधक विद्यार्थी थेट सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदार संघातील परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारपासून साखळी उपोषण करत आहेत. मागणी पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहील, असा ठाम निर्धार आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, आंदोलक विद्यार्थ्यांनी मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यास दिले आहे. त्यांनी पुढील कारवाईसाठी निवेदन संबंधित विभागास तत्काळ पाठविण्यात येत असल्याचे सांगितले आहे. या आंदोलनात नारायण खरात, अक्षय जाधव, अमोल घुगे, भगवान चोपडे, भिमराव वाघमारे, संदीप तुपसमुद्रे, श्रद्धा सिरसाट, दीक्षा ढगे, सारिका दळवी, अनिता शिंदे, उषा इंगळे, सविता गंगावणे, सुनील वाघमारे, मीनाक्षी वाकेकर, छाया सौंदरमल, अरुणा सपकाळ, अमोल शिंदे, सिद्धार्थ कांबळे, रामेश्वर गोरे, अमोल चोपडे, प्रमिता भोजने, विशाखा रगडे, सिद्धांत सोनवणे, प्रीतम मोरे यांच्यासह अनेक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.