बनावट कागदपत्रांच्या आधारे देवस्थानच्या खात्यावरील रक्कम उचलली; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:43 AM2018-11-28T00:43:24+5:302018-11-28T00:43:45+5:30
तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानची बँकेच्या खात्यावरील १८ हजारांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून परस्पर उचलून अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानची बँकेच्या खात्यावरील १८ हजारांची रक्कम बनावट कागदपत्रे आणि शिक्के बनवून परस्पर उचलून अपहार केल्याच्या आरोपावरून दोघा जणांवर माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीवन रंगनाथ खेडकर हे वंशपरंपरेने तालखेड येथील श्री नृसिंह देवस्थानचे पुजारी आहेत. मंदिराची जमीनही त्यांच्या ताब्यात आहे. जीवन खेडकर यांचे वडील रंगनाथ यांचा मागील वर्षी ४ आॅगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यांनतर १ आॅक्टोबर ०१८ रोजी जीवन यांनी नृसिंह देवस्थानच्या रंगनाथ खेडकर यांच्या तालखेड येथील डीसीसी बँकेच्या खात्यातील शिल्लक रक्कम तपासली असता ५ सप्टेंबर २०१७ रोजी प्रशांत रघुनाथ मोरे व कल्याण देविदास खोटे या दोघांनी १८ हजार रुपये उचलल्याचे आढळून आले. मंदिराचे कुठलेही ट्रस्ट मंजूर नसताना त्या दोघांनी नृसिंह देवस्थान तालखेड असा बनावट शिक्का बनवून सदरील १८ हजारांचा अपहार केला. याबाबत जीवन खेडकर यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी व्यवहारात वापरले गेलेले आवश्यक ते सर्व दस्तावेज उपलब्ध करून दिले. त्यांनतर जीवन खेडकर यांनी सर्व दस्तावेज घेऊन माजलगाव ग्रामीण ठाण्यात ताकार दिली. त्यांच्या तक्रारीवरून प्रशांत रघुनाथ मोरे व कल्याण देविदास खोटे या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.