झुंज अपयशी! ट्रॅव्हल्सने उडविलेल्या तरूणाचा सहा दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:30 PM2022-08-30T19:30:00+5:302022-08-30T19:30:22+5:30
बीड-कडा-नगर राष्ट्रीय महामार्गावर जळगाव येथील घटना
कडा (बीड): अहमदनगरवरून बीडला भरधाव वेगात जात असलेल्या एका ट्रॅव्हल्सने दि. २४ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास एका पादचारी तरुणास पाठीमागून जोराची धडक दिली होती. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. गंगाराम आप्पा फुलमाळी असे मृत तरुणाचे नाव आहे .
आष्टी तालुक्यातील कडा कारखाना येथील गंगाराम आप्पा फुलमाळी हे दि.२४ ऑगस्ट रोजी बीड कडा नगर राष्ट्रीय महामार्गावरून रात्री १२:३० वाजेच्या सुमारास चालत घरी जात होते. यावेळी अहमदनगरवरून बीडकडे जात असलेली टॅव्हल्स ( क्रमांक एम.एच १८ ,बी.ए.३६९९) फुलमाळी यास जळगावजवळ पाठीमागून जोराची धडक दिली. यात फुलमाळीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सहा दिवस प्रयत्न करून देखील उपचारादरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक वाहनासह फरार झाला आहे. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले, आई, भाऊ असा परिवार आहे.