घरात लाच घेताना बीडीओ मिसाळ एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:03 AM2021-02-18T05:03:51+5:302021-02-18T05:03:51+5:30
बीड : पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर देयक मंजूर करण्यासाठी ३७ हजार रुपयांची लाच घेताना गटविकास अधिकारी ...
बीड : पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर देयक मंजूर करण्यासाठी ३७ हजार रुपयांची लाच घेताना गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
नारायण मिसाळकडे पाटोदा येथील गटविकास अधिकारी तसेच अतिरिक्त बीड येथील गटविकास अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार होता. पाटोदा तालुक्यातील एका गावात सार्वजनिक विहीर करण्यात आली होती. त्याचे देयक देण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. बुधवारी बीड येथील राहत्या घरी ३७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी मिसाळ याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधीक्षक बाळकृष्ण हानपुडे, कर्मचारी सखाराम घोलप, विजय बरकडे, अमोल बागलाने, चालक म्हेत्रे यांनी केली.