सावधान..! तोंडातील जिवाणूंमुळे होऊ शकतो न्युमोनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:31 AM2021-08-29T04:31:59+5:302021-08-29T04:31:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : न्युमोनिया होण्याची विविध कारणे आहेत. त्यातच दातांच्या फटींमध्ये अन्न अडकून त्यात होणारे जिवाणू श्वसनाद्वारे ...

Be careful ..! Bacteria in the mouth can cause pneumonia | सावधान..! तोंडातील जिवाणूंमुळे होऊ शकतो न्युमोनिया

सावधान..! तोंडातील जिवाणूंमुळे होऊ शकतो न्युमोनिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : न्युमोनिया होण्याची विविध कारणे आहेत. त्यातच दातांच्या फटींमध्ये अन्न अडकून त्यात होणारे जिवाणू श्वसनाद्वारे फुफ्फुसात जाऊन न्युमोनिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतर बाबींप्रमाणे दातांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. कोविडमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता व ते सुदृढ राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी माहिती स्वाराती रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिल मस्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

वयोमानानुसार फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मागील दशकात फुफ्फुसांच्या संसर्गजन्य रोगामुळे २६ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. अंबाजोगाई व परिसरातही धुराव्यतिरिक्त धुळीमुळे होणाऱ्या फुफ्फुसाच्या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. हे प्रमाण कोविडमुळे मास्क वापरणे वाढल्याने कमी झाल्याचे डॉ. मस्के यांनी सांगितले.

दरम्यान, एकत्रित पद्धती व लसीकरणाचा वाढलेला टक्का बघता तिसरी लाट ही सौम्य असू शकते, असेही त्यांनी सांगितले. अन्य देशांमध्ये तिसरी लाट आलेली आहे. त्या मानाने आपल्याकडील रुग्णसंख्या कमी आहे. मात्र काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना गेलेला नाही, तो कमी झाला आहे. त्यामुळे मास्कचा वापर, सामाजिक अंतर व स्वच्छता या बाबी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.

...

‘तो’ धूर अधिक घातक

सध्या डासांपासून होणाऱ्या आजारांची संख्या वाढत असल्याने डास दूर पळविण्यासाठी बंद घरात क्वाईल, अगरबत्त्या जाळल्या जातात मात्र हा धूर १०० सिगारेटच्या धुराइतका असतो. त्यामुळे बंद खोलीत तो अधिक धोकादायक असतो. त्यामुळे या ऐवजी मच्छरदाणी किंवा खिडक्यांना जाळ्या लावाव्यात, असे डॉ. अनिल मस्के यांनी सांगितले.

...

पोस्ट कोविड रुग्ण कमी

पहिली लाट ही संथगतीने वाढली व संथगतीने कमी झाली. त्या तुलनेत दुसरी लाट मात्र, अतिशय झपाट्याने वाढली व त्याच वेगाने कमीदेखील झाली, असे सांगत दुसऱ्या लाटेत कोविडनंतर त्रास उद्वभवणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. लंग फायब्रोसीस अगदी शंभरातून एका रुग्णाला झाल्याचे या लाटेत समोर आल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांना काही महिन्यापर्यंत उपचार घ्यावे लागले. मात्र कालांतराने ते बरे झाले आहेत.

...

अशी घ्या काळजी..

पोटाचा घेर कमी करा. लठ्ठ व्यक्तींना जास्त घेरामुळे श्वास घेण्यासाठी प्राथमिक स्नायूंना योग्य काम करता येत नाही.

घाम येईपर्यंत व्यायाम करा, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने, हळद, ओवा, आले यांचा आहारात पूरक वापर करा, श्वसनाचे व्यायाम करा, मत्स्य तेल सेवन करा, वेळोवेळी लसीकरण करून घ्या. वयाच्या ५५ वर्षानंतर फुफ्फुसांच्या कर्करोगाची तपासणी करून घ्या. योग, मोकळ्या हवेत फिरणे, आहार, विहार याकडे प्राधान्याने लक्ष द्या. कोणताही आजार अंगावर काढू नका.

280821\fb_img_1630067534944.jpg

डॉ अनिल मस्के

Web Title: Be careful ..! Bacteria in the mouth can cause pneumonia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.