काळजी घ्या! बीड जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
By शिरीष शिंदे | Published: December 25, 2023 03:40 PM2023-12-25T15:40:08+5:302023-12-25T15:40:31+5:30
काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन
बीड : जवळपास दीड वर्षापूर्वी जिल्ह्यातून हद्दपार झालेला कोरोना आता पुन्हा परतला आहे. बीड जिल्ह्यात तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना चाचण्या पुन्हा सुरू केल्या आहेत. २४ डिसेंबर रोजीच्या अहवालानुसार, एकही अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली नाही, तर तीन आरटीपीसीआर टेस्ट पाॅझिटिव्ह आढळून आल्या. नेकनूर येथील एक, येळंब येथील एक तर वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील एक अशा एकूण तीन रुग्णांचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण चांगल्या स्थितीत असून घरीच त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, केरळ राज्यात जेएन-वन प्रकारचे रुग्ण अधिक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संवाद प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेतला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मुधोळ यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते.