दिवाळीत सुटीवर जाताना काळजी घ्या; बीड पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:39 PM2018-10-24T15:39:10+5:302018-10-24T15:41:55+5:30
दिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
बीड : दिवाळीत सुटी मिळाल्यानंतर गावी किंवा इतर ठिकाणी जाताना काळजी घेण्याचे आवाहन बीडपोलिसांनी केले आहे. घराला मजबूत कुलूप लावण्याबरोबरच आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती जवळील पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. तसेच प्रवासादरम्यानही चोरांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहनही पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनीं केले आहे.
दिवाळी हा सण अवघ्या पंधरवाड्यावर येऊन ठेपला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सुट्या लागताच त्यांना गावी किंवा मामाच्या गावी जाण्याचे वेध लागते. तसेच बाहेरगावी असलेले नौकरदार, माहेरी जाणाऱ्या विवाहिता आदींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु हे करताना प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या घरात जास्त रोख रक्कम किंवा दागिने व इतर किंमती ऐवज जास्त ठेवू नये, ठेवला तर तो सुरक्षित ठेवावा. तसेच आपल्या घराच्या आजुबाजूला राहणाऱ्यांसह जवळील पोलीस ठाण्याला कल्पनाही देणे गरजेचे आहे. यामुळे पोलीस आपल्या भागात जास्त गस्त घालू शकतात. त्यामुळे चारी, घरफोडी होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यासंदर्भात कळविले जाईल, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी सांगितले.
गर्दीत घ्या काळजी..
बसस्थानक, रेल्वे स्थानक, थांबे आदी ठिकाणी प्रवाशांची गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन पर्स, पॉकेट, दागिने, बॅग लंपास करण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्दीत गेल्यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी. एखादी व्यक्ती संशयीत वाटल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणे प्रमुखांनी केले आहे.