ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधान! हात पिवळे होण्याआधीच खिसा होईल रिकामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:00+5:302021-09-16T04:42:00+5:30
बीड : आजच्या परिस्थितीमध्ये तरुण-तरुणी उच्चशिक्षण, नोकरी. त्यानंतर लग्नाचा जोडीदार शोधणे असा जीवनक्रम बनला आहे. यातदेखील काम व नोकरीत ...
बीड : आजच्या परिस्थितीमध्ये तरुण-तरुणी उच्चशिक्षण, नोकरी. त्यानंतर लग्नाचा जोडीदार शोधणे असा जीवनक्रम बनला आहे. यातदेखील काम व नोकरीत व्यस्त असल्याने तसेच कुटुंबासोबतदेखील ऑनलाइन भेटी-गाठी होत आहेत. त्यामुळे लग्नाचा जोडीदार शोधण्यासाठी विविध विवाह संस्थांमध्ये ऑनलाइन वेबसाईटची मदत घेतली जात आहे; परंतु काही वेळा अशा वेबसाईटच्या माध्यमातून आर्थिक फसवणूकदेखील झाल्याचे प्रकार समोर आले आहे.
तरुण-तरुणी कोरोनाच्या काळापासून सर्व माहितीची देवाणघेवाण तसेच शिक्षण, नोकरी व्यवसाय ऑनलाइन करीत आहेत. विवाहयोग्य तरुण-तरुणी अनुरूप जोडीदार मिळावा, यासाठी ऑनलाइन वेबसाईटचा वापर करीत आहेत. कुटुंबातील पालक यात सक्रिय असून, त्यांना स्थळ चांगलं वाटल्यानंतर ते मुलाला किंवा मुलीला फोटो व माहितीची लिंक शेयर करतात. त्यातून अनेकांना योग्य जोडीदारदेखील मिळतो. तर काही वेबसाईटवरून आर्थिक फसगत होते. त्यामुळे ओळखीची व्यक्ती मध्यस्त असेल तर किंवा ती वेबसाईट विश्वसनीय असेल तरच अशा ठिकाणावरून विवाहासाठी जोडीदार शोधणे गरजेचे आहे. अन्यथा आपली गोपनीय माहिती सार्वजनिक होऊ शकते किंवा आर्थिक फसवणूकदेखील होते. त्यामुळे ऑनलाइन जोडीदार शोधताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
..
कोरोनानंतर ऑनलाइन जोडीदार शोधमोहीम
कोरोना झाल्यापासून अनेक मुला-मुलींकडून ऑलनाइन जोडीदार शोधण्याला प्राधान्य दिले जात आहे. यात आपल्या माहितीच्या आधारे फसवणूक करणारे समोरील गरजू, विधवा तसेच तुमची गोपनीय माहिती घेऊन संबंधिताला पैशाची मागणी करून फसवता येते का? याची शहानिशा करून मगच वैयक्तिक संवाद साधतात. यात खोटे नाटक करून मग पैशाची मागणी करतात. ही पद्धत आता वाढली आहे.
..
...अशी होऊ शकते फसवणूक
विवाह संस्थेच्या ऑनलाईन वेबसाईट ज्या काही सुरु आहेत. तेथे सर्व माहिती टाकतात. त्या अधिकृत आहेत की नाही, याची तपासणी करावी. अनेक जण खोटे फोटो किंवा प्रोफाईल तयार करून तुम्हाला वेगवेगळ्या साईटचा वापर न करता वैयक्तिक सोशल मीडियावर मैत्रीचा अर्ज करतात. यात लगेच मोबाइल व ई-मेल याची माहिती घेतली जाते.
मोबाइलवर सतत संपर्क करून मैत्री वाढविली जाते. यानंतर तुमची ओळख वाढल्यावर प्रोफाईल डिलीट करून टाकले जाते. यानंतर मग तुमच्याशी जवळीक साधून अडचण झाल्याचे खोटे कारण देत पैसे मागितले जातात. यातून तुमची फसवणूक होते.
...
..ही घ्या काळजी
विश्वसनीय विवाह संस्था वगळता अन्य कोणत्या वेबसाईटवर लग्नाच्या अनुषंगाने माहिती शेअर करू नका. जरी केली तर समोरील व्यक्तीने पैशाची मागणी केली तर ते पाठवू नका, तसेच कोणालाही ऑनलाइन माहिती देताना ती गोपनीय राहील, याची काळजी घ्या. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा. फसगत टाळणे आपल्या हातात आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी.
-आर.एस.गायकवाड, सायबर विभाग प्रमुख, बीड.