बीडमध्ये अर्भकाला बाभळीच्या झुडपात टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 02:42 AM2019-04-30T02:42:52+5:302019-04-30T02:43:08+5:30
तीन दिवसांच्या अर्भकाला नाळेसह काटेरी बाभळीच्या झुडपात फेकून जन्मदातीने निर्दयतेचा परिचय दिला, तर त्या अर्भकाला रुग्णालयात आणून ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय दिला.
बीड : तीन दिवसांच्या अर्भकाला नाळेसह काटेरी बाभळीच्या झुडपात फेकून जन्मदातीने निर्दयतेचा परिचय दिला, तर त्या अर्भकाला रुग्णालयात आणून ग्रामस्थांनी माणुसकीचा परिचय दिला. तालुक्यातील कपीलधारवाडी येथे सोमवारी उघडकीस आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या अर्भकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
बीड शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर कपीलधारवाडीपासून २०० मीटर अंतरावर एका काटेरी बाभळीच्या झुडपात हे जिवंत अर्भक सकाळी शौचास गेलेल्या नागरिकांना दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती पाली येथील पोलीस पाटील वैजिनाथ नवले यांना दिली.
पोलीस तेथे पोहोचेपर्यंत ग्रामस्थांनी बाळाला बाहेर काढले. काही महिलांनी ओल्या कपड्याने त्या बाळाचे अंग पुसले, तर एका महिलेने त्याला दूध पाजले. त्यानंतर, बाळास तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले. येथे अतिदक्षता विभागात तत्काळ उपचार करण्यात आले. नवले यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर महिला पोलीस नियुक्त
बाळाला जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देणे गरजेचे होते, तसेच काळजी घेण्यासाठी महिला पोलीस नियुक्त करणे अपेक्षित होते. मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत तसे काहीच नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने आॅनलाइन वृत्त प्रकाशित करताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली, तसेच तत्काळ दोन महिला पोलीस कर्मचारीही नियुक्त करण्यात आल्या.