आगामी एक महिन्याच्या पावसावर बीड जिल्ह्याची मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:03 AM2019-09-04T00:03:37+5:302019-09-04T00:04:05+5:30
जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे.
बीड : जिल्ह्यात यंदाही पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरण होते. मागील दोन तीन दिवसांत सौम्य स्वरुपाच्या पावसामुळे दिलासा मिळत असला तरी मागील दोन वर्षांतील पावसाळ्याच्या पहिल्या तीन महिन्यात कोरड्या दिवसांचे प्रमाण सारखेच २७ इतके आहे. या दोन वर्षांच्या तुनलेत २०१७ मध्ये मात्र ९२ पैकी ३८ दिवस पाऊस झाल्याने कोरडे दिवसाचे प्रमाण ५४ इतकेच राहिले.
गतवर्षीच्या कमी पाऊसप्रमाणामुळे साठलेल्या पाण्याचा आतापर्यंत सर्वत्र विनियोग करता आला. मात्र चालू वर्षात स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. पुढील ३५ दिवसात पडणाऱ्या पावसावरच मदार आहे.
बीड जिल्ह्यात १ जून ते २ सप्टेंबरपर्यंत २६४५.४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत सरासरी पावसाचे प्रमाण २४०.५ इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ७३.९ मिमी पाऊस कमी झाला आहे. प्रशासनाकडे नोंदल्या गेलेल्या पावसानुसार जून ते आॅक्टोबर या कालावधीत २०१७ मध्ये ७०४.६ मिमी पाऊस झाला. या पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली.
२०१८ मध्ये मात्र पावसाचे प्रमाण निम्यावर ३३४. ७ मिमी राहिले. २०१९ मधील जून, जुलै आॅगस्टपर्यंतचे प्रमाण पाहता यंदाही पाऊस सरासरीपर्यंत पोहोचतो की नाही, याची चिंता सर्वसामान्यांसह प्रशासनालाही लागली आहे.