बीड जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या वादाला कलाटणी; चौघांची माघार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 04:46 PM2019-12-28T16:46:43+5:302019-12-28T16:49:52+5:30
जिल्हा रुग्णालयातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपसंचालकांना गुरूवारी तक्रार केली होती.
बीड : जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार करणाऱ्या ११ पैकी ४ डॉक्टरांनी माघार घेतल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. सोमवारी यावर निर्णय होणार असल्याचेही विश्वसनिय सूत्रांकडून समजते.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै
आपल्याला रजा दिली जात नाही, जास्त ड्यूटी लावल्या जातात, मनमानी कारभार चालविला जातो, असे आरोप करीत जिल्हा रुग्णालयातील ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांना गुरूवारी तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी डॉ.राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ.महादेव चिंचोले यांच्यात रजेच्या कारणावरून ‘तू तू-मैं मैं’ झाली होती. त्यामुळे हे प्रकरण वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. अशातच शनिवारी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तक्रारीवर स्वाक्षऱ्या असलेल्या ११ पैकी ४ डॉक्टरांनी यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला अंधारात ठेवून तक्रारीवर स्वाक्षऱ्या घेतल्याचे त्यांचे म्हणने आहे. मात्र, त्यांनी अद्याप यावर लेखी स्वरूपात प्रशासनाला कळविलेले नाही. लेखी स्वरूपात नसल्याने त्या चार डॉक्टरांची नावे समोर आलेले नाहीत. दरम्यान, ज्या डॉक्टरांवर अन्याय झाला आहे, त्यांचे म्हणने सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक ऐकूण घेणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. तसा संदेशही संबंधित डॉक्टरांना गेल्याचेही कळते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांचा भ्रमणध्वणी बंद होता.
वाद वाढणार कि मिटणार?
जिल्हा रुग्णालयात मागील चार दिवसांपासून डॉक्टरांमध्ये चांगलेच वाद होताना दिसून येत आहेत. याच वादावर आता सोमवारी चर्चा होणार आहे. या चर्चेत वाद वाढणार कि मिटणार? हे सोमवारी दुपारपर्यंत समजेल. यात तक्रारदार डॉक्टरही उपस्थित राहतील कि नाही, यातही शंका व्यक्त होत आहे.