बीड जिल्हा रुग्णालय ‘आयसीयू’मध्ये गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:59 AM2018-07-11T00:59:07+5:302018-07-11T00:59:27+5:30
बीड : रुग्णावर वेळेवर व योग्य उपचार करण्यावरून जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ब्रदर व रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काचेची तोडफोड झाली आहे. एवढा गोंधळ झाल्यानंतरही याबाबत रात्री उशिरापर्यंत कसलीच तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नव्हती. सर्वात शांत असलेल्या आयसीयू कक्षातच हाणामारी झाल्याने इतर रुग्ण व नातेवाईकांची घबराहट झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी तात्काळ धाव घेत प्रकरण शांत केले. ही घटना सोमवारी रात्री ९ वाजता घडली.
विकास रामराव राऊत असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथील रुग्णालयातून एका रुग्णाला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले.रात्री ९ वाजेच्या सुमारास इंजेक्शन का देत नाहीत, असे म्हणत रुग्णाचा मुलगा व ब्रदरमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. याचे रूपांतर नंतर हाणामारीत झाले. हा प्रकार समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनाही पाचारण करण्यात आले
जिल्हा शल्यचिकित्सकांचे एसपींना पत्र
जिल्हा रूग्णालयातील गोंधळाचे गांभीर्य लक्षात घेत डॉ.थोरात यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना तात्काळ पत्र लिहून प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली. त्याआधारे कारवाईचे आदेश श्रीधर यांनी दिले. परंतु रात्री उशिरापर्यंत ठाण्यात काहीच दाखल नव्हते. हे प्रकरण आपपसात मिटल्याची चर्चा होती. दरम्यान, हा वाद मिटला तरी शासकीय मालमत्तेचे नुकसान व गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु जिल्हा रूग्णालय प्रशासनानेही यावर कसलीच कारवाई केली नाही.
रुग्णालयाची प्रतिमा पुन्हा मलिन
एकीकडे काही अधिकारी, कर्मचारी जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी धडपड करीत आहेत. तर दुसºया बाजूला उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. किरकोळ वादावरून हाणामारीसारख्या घटना घडल्याने रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. आगोदरच परिचारिकांच्या चुकीमुळे मूल अदलाबदल प्रकरणात रुग्णालय राज्यभर बदनाम झाले. आता पुन्हा चक्क सर्वात शांत समजल्या जाणाºया आयसीयूमध्येच गोंधळ झाल्याने रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे.
काच फुटल्याचे ब्रदरने केले कबूल
वाद झाल्यानंतर डॉ.थोरात यांनी तात्काळ सर्वांचे लेखी जबाब घेतले. यामध्ये राऊत यांनी आपल्याकडूनच काच फुटल्याचे लेखी जबाबात म्हटले आहे. एवढे असूनही प्रशासनाने त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.