बीड, नगरमध्ये अवकाळीचे ४ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 06:47 AM2019-04-05T06:47:46+5:302019-04-05T06:48:05+5:30
मराठवाड्याला झोडपले; फळबागांचे मोठे नुकसान
बीड/अहमदनगर : गेल्या दहा दिवसांपासून तापमानाचा पारा चढलेला असतानाच गुरुवारी मराठवाड्यासह नगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये वीज पडून चारजण ठार झाले. मृतांमध्ये नगर आणि बीड जिल्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. गारपीटीमुळे आंबा, हळद, केळी, द्राक्षे या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा येथील शेतात कामासाठी गेलेल्या तारामती चाटे व धारुर तालुक्यातील धुनकवड येथील संदीप काळे हे वीज पडल्याने ठार झाले. दरम्यान वडवणी तालुक्यातील मौजे पुसरा शिवारात बाबी तांडा येथे वीज पडल्याने गोविंद नानू राठोड यांचा एक बैल ठार झाला तर एक बैल गंभीर जखमी झाला. अहमदनगर जिल्ह्यातील येळपणे- पिसोरे (ता. श्रीगोंदा) येथे वीज पडून बकुळा गिरे (२८) यांचा मृत्यू झाला. तर कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथे मेंढपाळ संभाजी पाटोळे (६३) हे अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाले. वादळामुळे आंब्याचा मोहर गळाला. द्राक्षे, लिंब, संत्री, मोसंबी आदी फळबागांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी सरी बरसल्या. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, सेनगाव, कळमनुरी तालुक्यात गारपीट आणि पाऊस झाला.
सोलापूरलाही बसला तडाखा
सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे आंबा, केळीचे नुकसान झाले. पंढरपूर, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा तालुक्यात वादळी वाºयासह पाऊस पडला. करमाळा तालुक्यात जोरदार वादळी वाºयाने भोसे, हिवरवाडी, मांगी, जातेगाव, संगोबा, माळवाडी या भागात कैºया मोठ्या प्रमाणात गळून पडल्या.