भडंगवाडीत धुमाकूळ घालणाऱ्या दरोडेखोरांचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:17 PM2018-10-13T12:17:51+5:302018-10-13T17:00:38+5:30
गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे ९ आॅक्टोबर रोजी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला.
बीड : गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथील तीन घरांमध्ये पडलेल्या दरोड्याचा बीडपोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चौघांना बेड्या ठोकून त्यांच्याकडून पिस्तूल, तीन जिवंत काडतूसांसह इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
सावन रतन चव्हाण [१९, रा. पारधी वस्ती, तालखेड, ता. माजलगाव], संदीप अशोक सुसे [२०], सुंदरसिंग शिवाजी भोसले [२०] व अन्य एक अल्पवयीन [सर्व रा. गौंडगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर] अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
१० आॅक्टोबर रोजी भडंगवाडी येथे तीन घरांवर दरोडा पडला होता. यामध्ये एका महिलेस मारहाण करुन हजारोंचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. शुक्रवारी रात्री ८ पैकी ४ दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आले. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, गेवराईचे उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे, तलवाड्याचे पो. नि. हर्षवर्धन गवळी, सपोनि दिलीप तेजनकर, गजानन जाधव यांच्यासह कर्मचा-यांनी केली.
पिस्तूलासह काडतूस जप्त
दरोडेखोरांकडून एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस जप्त केले आहेत. तसेच दोन लोखंडी सुरे, एक बॅटरी, पिवळ्या धातूची अंगठी, ६ मोबाईल, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक बटनाचा चाकू, एक लोखंडी टांबी, एक दुचाकी, तीन लोखंडी पक्कड, नट खोलण्याचे पाने, पाच पिवळ्या धातूच्या बांगड्या, चार पायातील चैन, एक चांदीची वाटी, चार मिरची पूड, दोन सुती दोर असे साहित्य आढळून आले.
अशी झाली चोरी
भडंगवाडीचे सरंपच ज्ञानेश्वर राधाकिशन नवले हे कुटूंबासह घराच्या छतावर झोपले होते. हीच संधी साधून चोरटे घरात शिरले. घरात चार्जिंगला लावलेला मोबाईल घेत इतर ठिकाणी उचकापाचक केली. मात्र, हाती काहीच लागले नाही. नंतर शेजारीच असलेल्या सिताबाई मुरलीधर भोजगुडे यांच्या घरात प्रवेश केला. सिताबाई या एकट्याच राहतात. मंगळवारी रात्री त्या घर बंद करून आपल्या भाचीकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्या घरातील रोख दहा हजार रूपये दरोडेखोरांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा राणी रोहिदास कोकरे यांच्या घराकडे वळविला. राणी या आपल्या मुलासह घरात झोपल्या होत्या. दरवाजा उघडाच असल्याने चोरटे थेट राणीच्या खोलीत पोहचले. तिच्या अंगावरील दागिने घेत असताना तिला जाग आली. ती जोरात ओरडली. ओरडण्याने सासू जानकाबाई जाग्या झाल्या. याचवेळी एका दरोडेखोराने त्यांना काठीने मारहाण केली. जास्त आरडाओरडा झाल्याने दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी जानकाबाई यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात होते.