बीडचे एआरटीओ कार्यालय २० वर्षांनंतर ट्रॅकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:00 IST2019-06-13T23:59:27+5:302019-06-14T00:00:05+5:30
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ट्रॅकसाठी शासकीय जागा उपलब्ध झाली असून तब्बल २० वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

बीडचे एआरटीओ कार्यालय २० वर्षांनंतर ट्रॅकवर
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ट्रॅकसाठी शासकीय जागा उपलब्ध झाली असून तब्बल २० वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. तालुक्यातील नगररोड भागातील शहाजानपूर शिवारात शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम आणि वाहनाच्या ट्रॅकसाठीचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू झाले आहे.
परिवहन खात्याच्या वतीने बीड जिल्हयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू आहे. हे कार्यालय सुरु झाल्यापासून खाजगी किरायाच्या जागेत होते. २० वर्षापासून सदर कार्यालयात जागा उपलब्ध व्हावी, यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शासन पातळीवर प्रयत्न केले.
जालना रोडवर नामलगाव फाट्याजवळ सध्या सुरू असलेल्या कार्यालयाच्या मागे कुमशी शिवारात जागा मिळाली होती. मात्र सदर जागेचा वाद अनेक वर्षे न्यायालयात प्रलंबित होता. तर धानोरा रोडवरील चेमरी परिसरातही कार्यालयास जागा उपलब्ध करून देण्यातबाबत प्रयत्न झाले. मात्र सर्व प्रयत्न विविध कारणांमुळे तोकडे पडले. एक वर्षापूर्वी या कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर राज बागरी यांनी जागा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
उपप्रादेश्कि परिवहन कार्यालय खाजगी जागेत असल्याने शासनाला मोठा आर्थिक भार उचलावा लागला आहे. तर हक्काची जागा मिळण्यास विविध अडचणी येत होत्या. मागील वर्षी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी वर्धेकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना भेटून पाठपुरावा केला. तर परिवडन खात्याच्या वरिष्ठांकडेही या विषयावर पाठपुरवा करण्यात आला.
हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनदरबारी राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले. अखेर शहाजानपूर भागात जागा उपलब्ध झाली असून, इमारत बांधकामाला किमान दीड वर्ष लागणार आहे. तर ट्रॅक व नोंदणीचे काम नोव्हेंबरपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे.
शहाजानपूर शिवारात १२ एकर जागा उपलब्ध
दोन दिवसांपूर्वी शहराच्या नगररोड भागात शहाजानपूर शिवारात १२ एकर जागा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. जागेची मंजुरी आणि कामाचे कार्यारंभ आदेश प्राप्त झाले आहे.
सदर जागेवर कार्यालयाची इमारत तसेच वाहन नोंदणी ट्रॅकचे काम सुरू झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू झाले आहे.