बीडचा चेहरामोहरा बदलू - नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:39 AM2018-04-20T00:39:38+5:302018-04-20T00:39:38+5:30

रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी केंद्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी दिला आहे. १० हजार कोटी रुपये रस्ते कामांसाठी मंजूर केले आहेत. ६ हजार कोटींची कामे सुरू झाली. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Bead's face change - Nitin Gadkari | बीडचा चेहरामोहरा बदलू - नितीन गडकरी

बीडचा चेहरामोहरा बदलू - नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : रस्ते, वीज, पाणी व सिंचन या योजनांची परिपूर्ती होत असल्याने गाव समृद्ध व संपन्न होत आहे. महानगरातील लोकांना ग्रामीण भागाच्या विकासाचा हेवा वाटावा अशा पद्धतीचा विकास केंद्र व राज्य शासनाने करून दाखविला. भविष्यात महाराष्ट्र बदलेला दिसेल. महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी केंद्र शासनाने बीड जिल्ह्यासाठी दिला आहे. १० हजार कोटी रुपये रस्ते कामांसाठी मंजूर केले आहेत. ६ हजार कोटींची कामे सुरू झाली. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलू असा विश्वास केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथे भारतीय राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यात ६ हजार ४२ कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. प्रीतम मुंडे, लातूरचे खा. सुनील गायकवाड, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. आर. टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. प्रा. संगीता ठोंबरे, आ. सुधाकर भालेराव, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ. केशव आंधळे, गणेशराव हाके, अंबासाखरचे अध्यक्ष रमेश आडसकर, फुलचंद कराड, गयाबाई कराड, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले, गाव समृद्ध व संपन्न करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. साखर कारखान्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण करण्यासाठी इथेनॉलला प्राधान्य दिले जाणार आहे. साखर कारखान्यांची इथेनॉल पंप चालतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच इथेनॉलच्या माध्यमातून बायोप्लास्टिकची निर्मिती करून प्लास्टिक उत्पादन वाढविले जाईल. पेट्रोलियम प्लास्टिक नष्ट होत नसल्याने ते पर्यावरणाला घातक ठरते. मात्र, बायोप्लास्टिक तीन दिवसात जमीनदोस्त होते. ही संकल्पना समोर ठेवून इथेनॉलपासून बायोप्लास्टिकचा प्रकल्प महाराष्ट्र शासन हाती घेणार असल्याचे गडकरी म्हणाले.

महाराष्ट्रात ३० नदीजोड प्रकल्पांचे काम हाती घेतले असून केवळ मराठवाड्यात गोदावरीचे वाहणारे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून सर्व धरणांमध्ये सोडले जाईल, अशी व्यवस्था होईल. तीन वर्षात ५० हजार कोटींचा हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जाईल, असे ते म्हणाले.

आगामी काळात रस्त्यांच्या मोठ्या जाळ्यामुळे शेतीमालाला किंमत व गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच बेघर व्यक्तीला घर उपलब्ध करून देण्यासाठी एक मॉडेल योजना आखली आहे. २ लाख ६० हजार रुपयांमध्ये ४५० चौ. मी. चे घर तेही परिपूर्ण सोयींनी उपलब्ध केले जाणार आहे. देशात बेघर कोणी राहणार नाही. यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल असे ते म्हणाले.

मुंडेंच्या आठवणींनी गडकरी गहिवरले
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राज्याच्या विकासाला दिशा दिली. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केले. सहकारातही मी मुंडेंच्या प्रेरणेतूनच आज तीन साखर कारखान्यांची निर्मिती केली. ते असताना बीड जिल्ह्यात येण्याची संधी अनेकदा मिळाली. मात्र, त्यांच्या स्मृती आम्हाला कायम शक्ती देत राहतील. कै. मुंडे यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कन्या पंकजा व प्रीतम या चांगल्या कामाच्या माध्यमातून जोपासत आहेत. स्व. मुंडे यांच्या अधुºया स्वप्नांची पूर्तता विकासाच्या माध्यमातून त्या दोघीही करतील, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रारंभी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रास्ताविक रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले. सूत्रसंचालन भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले. उपस्थितांचे आभार आ. संगीता ठोंबरे यांनी मानले. पारा ३८ अंशावर असतानाही तळपत्या उन्हात बीड व लातुर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. रस्ते
केंद्रातील भाजप सरकारने साडेतीन वर्षात १५ हजार कि.मी. चे रस्ते महाराष्ट्रात केले. गेल्या ६७ वर्षात केवळ ५ हजार कि. मी. चे काम झाले होते. विकासाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. याची प्रचिती विकासकामाच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवण्यात आली. आगामी काळातही अनेक क्रांतिकारी योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला विकासाच्या शिखराकडे नेण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र शासनानेही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात ३० हजार रस्त्यांची निर्मिती केली. यातील सर्वात जास्त रस्ते बीड जिल्ह्यात झाले आहेत. शौचालयाची संख्या शंभर टक्के करण्यात राज्य यशस्वी झाले आहे. राज्यातील १२ लाख बेघरांना घर देण्यासाठी १० लाख लोकांची सर्व्हेद्वारे नोंदणी झाली आहे. तर उर्वरित २ लाख लोकांची नोंदणी सुरू आहे. येत्या तीन महिन्यात घराचा पहिला हप्ता दिला जाणार आहे व हे काम लवकर पूर्ण करण्यात येईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात मोठी कर्जमाफी योजना आमच्या सरकारने राबविल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, पूर्वी मराठवाडयातील आठ जिल्ह्यात १४०० कोटी रुपये माफ झाले होते. आता एकट्या बीड जिल्ह्याचे ७०० कोटी माफ झाले व आणखी ४०० कोटी बीड जिल्ह्यातील शेतकºयांना मिळतील, अशी घोषणा त्यांनी या वेळी केली. जलयुक्त शिवारचे काम बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाल्याने जलस्वयंपूर्ती व टँकरमुक्तीसाठी बीड जिल्हा अग्रेसर राहिला. शेवटच्या माणसाचा सर्वांगिण विकास हेच ध्येय ठेवून आमची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Bead's face change - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.