प्रसुतीत पुणेनंतर बीड ठरणार मॉडेल; जिल्हा रुग्णालयाकडून ‘वचनपूर्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:19 AM2018-01-09T00:19:06+5:302018-01-09T00:19:49+5:30
बीड जिल्ह्यातील पाच केंद्रांवर एका महिन्यात तब्बल ७४९ महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये १६० सिझरचा समावेश आहे. यामुळे पुणेनंतर बीड जिल्हा राज्यात ‘मॉडेल’ ठरणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य आयुक्तांनी दिलेले १५० (एका महिन्यात) प्रसुतींचे चॅलेंज बीड जिल्हा रूग्णालयाने पूर्ण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील पाच केंद्रांवर एका महिन्यात तब्बल ७४९ महिलांची प्रसूती झाली आहे. यामध्ये १६० सिझरचा समावेश आहे. यामुळे पुणेनंतर बीड जिल्हा राज्यात ‘मॉडेल’ ठरणार आहे. विशेष म्हणजे आरोग्य आयुक्तांनी दिलेले १५० (एका महिन्यात) प्रसुतींचे चॅलेंज बीड जिल्हा रूग्णालयाने पूर्ण केले आहे.
केवळ जिल्हा रूग्णालयात प्रसुतीची व्यवस्था होती. उपजिल्हा, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा नाही, असे कारण सांगत महिलांना जिल्हा रूग्णालयाची वाट दाखविली जात असे. यामध्ये गर्भवती मातांना ‘कळा’ सहन कराव्या लागत होत्या. यामुळे आरोग्य यंत्रणेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी जिल्ह्यात जिल्हा रूग्णालय वगळून गेवराई, केज, माजलगाव, परळी व नेकनूर येथे प्रसुतीची व्यवस्था केली. याठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची नियूक्ती केली. या पाच केंद्रांमध्ये पूरेशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे गर्भवती महिलांना प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात येण्याची गरज राहिली नाही. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या प्रारंभीच हे केंद्र सुरू केले होते. या सर्व केंद्रांमध्ये प्रसुतीसाठी येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात केज अव्वल
पाच केंद्रांमध्ये केजमध्ये सर्वाधिक १९२ प्रसूती झाल्या आहेत. यामध्ये ५५ सिझरचा समावेश आहे. त्यानंतर परळी १७२, माजलगाव १४८, गेवराई १५९ तर नेकनूर ७८ यांचा क्रमांक येतो. नेकनूर परिसरात कमी गावे असल्याने आणि जिल्हा रूग्णालय जवळ असल्याने येथील १५० चे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
आष्टी येथे नवीन केंद्र सुरु करणार
आतापर्यंत पाच केंद्रांवर प्रसुतीची सुविधा आहे. सिझरचीही सुविधा आहे. आणखी आष्टी येथेही नवीन केंद्र सुरू करण्याचा विचार आहे. पुढील आठवड्यात यावर निर्णय होईल. डिसेंबर महिन्यात ७४९ महिलांची प्रसूती झाली असून, पैकी १६० सिझर आहेत. यापुढेही आमचे स्थान अव्वल राखून ठेवण्यासाठी माझ्यासह सर्व टिम परिश्रम घेईल.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
काय होते ‘चॅलेंज’
आरोग्य आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी राज्यात केवळ पुणे येथील दोन केंद्रांवर २५ सिझर व १२५ नॉर्मल प्रसुती होत असून तेच राज्यात अव्वल असल्याचे सांगितले होते. इतर जिल्ह्यात असे करण्यास कोण उत्सूक आहे, असे त्यांनी थेट सर्व जिल्हा शल्यचिकित्सकांना विचारले होते. यामध्ये बीडचे सीएस डॉ.थोरात यांनी आपण हे करू शकतो. आयुक्तांनी दिलेले चॅलेंज त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून पूर्ण करून दाखविल्याने त्यांचे स्वागत होत आहे.