बीडमध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आई, मुलाला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:59 AM2018-06-07T00:59:55+5:302018-06-07T00:59:55+5:30
पैशासाठी कोण काय करेल आणि कोणाला सोबत घेईल, याची शाश्वती नसते. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळी बीडमध्ये घडला. चक्क आई आणि मुलगाच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करून आई व मुलाला बेड्या ठोकल्या.
बीड : पैशासाठी कोण काय करेल आणि कोणाला सोबत घेईल, याची शाश्वती नसते. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळी बीडमध्ये घडला. चक्क आई आणि मुलगाच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला. यात एका महिलेची सुटका करून आई व मुलाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहरातील धानोरा रोड परिसरात केली.
पोलिसांच्या माहितीनूसार ६५ महिला आपल्या ३० वर्षीय मुलाच्या मदतीने कुंटणखाना चालविते. धानोरा रोड भागात त्यांचे दोन मजली घर आहे. तिसºया मजल्यावर हा व्यवसाय चालविण्यासाठी एक खोली तयार केली आहे. ग्राहकांकडून मागणी येताच हे दोघेजण महिला व मुलींना बोलावून घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी सकाळी याची माहिती पोलीस उपनिरीक्षक भारत माने, दीपाली गित्ते यांना मिळाली. त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना ही माहिती कळविली. त्यांच्या आदेशाप्रमाणे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, भारत माने, दीपाली गित्ते, सिंधु उगले, मिना घोडके, शेख शमिम पाशा, गोरख राठोड यांनी सापळा लावला. डमी ग्राहक पाठवून त्यांनी ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर ठाण्यात नोंद नव्हती.
आठवड्यात दुसरी कारवाई
तीन दिवसांपूर्वीच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू वस्तीमध्ये धाड टाकून एका महिलेची सुटका करून एका आरोपीला अटक केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा ही कारवाई केली. आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.