बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरफोड्या; माजी सैनिकाची चोरली रायफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 01:07 AM2018-08-28T01:07:49+5:302018-08-28T01:08:13+5:30
बीड शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.
बीड : शहरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. सावता माळी चौकात ३, तर सारडानगरीत १ घरफोडी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हजारोंचा ऐवज लंपास केला आहे.
सावता माळी चौकातील गणेश गाडे या रेणुकामाता बँकेच्या मॅनेजरचे घर चोरट्यांनी फोडले. गाडे हे किरायाने राहतात. त्यांच्या घरातून १९ हजार रुपये रोख, चार तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर शेजारीच असलेले सचिन बाहेती यांच्या घराचा कोंडा तोडून आत शिरले. बाहेती यांच्या घरातून रोख ६० हजार रुपयांसह इतर असा ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दोन घरफोड्या झाल्यानंतर चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घराकडे मोर्चा वळविला. चार महिन्यांपूर्वीच निवृत्त झालेले पंजाब श्रीधर चव्हाण (रा. घारगाव, ता. बीड) हे गावाकडे गेले होते. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरातील १२ बोर असलेली रायफल लंपास केली. परवाना दुरुस्तीसाठी त्यांनी ती घरात ठेवल्याचे सांगितले. येथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत.
चौथी चोरी सारडानगरीत झाली. किरायाच्या घरात राहणारे अशोक सानप हे पत्नीसह गावी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून कपाटातील रोख २६ हजार रुपये, अंगठी व छोट्या बाळाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन चोरट्यांचा मागोवा काढला. परंतु उशिरापर्यंत त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
चार चोरटे सीसीटीव्हीत कैद
सावतामाळी चौकात झालेल्या चोरीमध्ये चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. पहाटे ३.५७ वाजता चोरटे इमारतीत शिरले. ४.२० ला ते बाहेर पडल्याचे कॅमेऱ्यात दिसत आहे. सर्वांनी तोंडावर टॉवेल घेतल्याने त्यांचे चेहरे ओळखण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.