बीड जिल्हा परिषदेत पेन्शन सेल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:17 AM2019-07-12T00:17:26+5:302019-07-12T00:19:13+5:30
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पेन्शन सेल सुरु करण्यात आला आहे.
बीड : विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार बीडजिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पेन्शन सेल सुरु करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व इतर लाभ प्रदान करण्यासाठी हा विभाग सुरु करण्यात आलेला आहे. सदरील वेतन कक्षामध्ये आठ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाºयांकडे तालुकानिहाय जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लेखाधिकारी व्ही. बी. आव्हाड यांची पेन्शन सेलचे नियंत्रक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
सेवानिवृत्त कर्मचा-यांना निवृत्ती वेतन व इतर लाभ वेळेत अदा करण्याच्या दृष्टीने सर्व तालुक्यातील गटविकास अधिका-यांना दरमहा २० तारखेपर्यंत जिल्हा स्तरावर प्राप्त होणारे सर्व पंचायत समितीचे वेतन देयके २५ तारखेपर्यंत लेखा शीर्षकनिहाय तयार करुन ही रक्कम कोषागारातून आहरित करुन घेऊन सर्व पंचायत समितीचे सेवा निवृत्ती वेतन देयके तयार करुन त्यावर शिक्षणाधिकारी (प्रा.) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्या स्वाक्षºया घेऊन ही देयके वित्त विभागास बॅँक यादीसह सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
वित्त विभाग देयके पारित करुन धनादेश बॅँकेत यादीसह प्रत्येक महिन्याच्या १ तारखेस जमा करतील. मंगळवारी झालेल्या पेन्शन अदालतमध्ये बीड जिल्हा पेन्शनर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग गोरकर तसेच इतर पदाधिकारी व कर्मचाºयांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी आणि लेखाधिकारी आव्हाड यांनी सुरु केलेल्या पेन्शन सेलचा उद्देश स्पष्ट केला. तसेच या सेलच्या कामकाज प्रणालीची माहिती दिली.