महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीस मारहाण करत बळजबरीने नेले पळवून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:31+5:302021-02-20T05:35:31+5:30
माजलगाव : तालुक्यातील हरकी लिमगाव येथून माजलगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीस मारहाण करत लग्न करण्याच्या उद्देशाने बळजबरीने ...
माजलगाव : तालुक्यातील हरकी लिमगाव येथून माजलगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीस मारहाण करत लग्न करण्याच्या उद्देशाने बळजबरीने गाडीवर बसवून पळवून नेण्यात आले. ही घटना बुधवार रोजी माउली फाट्यानजीक भर रस्त्यावर घडली. मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून मजनू मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या सावित्रीच्या लेकींना समाजकंटक टवाळखोरांचा अटकाव होत असल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांत घबराटीचे वातावरण पसरत आहे.
हरकी लिमगाव येथील बारावी आणि तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या दोन सख्ख्या बहिणी सोळंके महाविद्यालयात प्रॅक्टिकलची परीक्षा देण्यासाठी आल्या होत्या. बुधवारी दीडच्या दरम्यान परीक्षा देऊन गावी हरकी लिमगावकडे ऑटोरिक्षाने परत जात होत्या. रिक्षा माउली फाट्यापर्यंतच जात असल्याने तेथून त्या गावाकडे पायी जात होत्या. या वेळी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास धनगर मळ्याजवळ त्यांच्याच गावातील अभिषेक निसर्गंध मोटारसायकलवरून आला. दोघी बहिणींना गाडीवर बसा म्हणून म्हणाला. यावेळी त्यांनी त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अभिषेक निसर्गंधने बारावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थिनीच्या तोंडात चापट मारली व जबरदस्तीने तिला गाडीवर बसवू लागला. ती बसत नसल्याने तिला बेल्ट काढून पाठीवर मारहाण केली. या वेळी बी.ए. तृतीय वर्षात असणाऱ्या मोठ्या बहिणीने आरडाओरड केली असता तिच्याही तोंडात अभिषेकने चापट्या मारून बेल्टने मारहाण केली व तिला बाजूला ढकलून देत बारावीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थिनीला लग्न करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने गाडीवर बसवून पळवून घेऊन गेला. गुरुवारी सकाळी अपहृत विद्यार्थिनीच्या मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी अभिषेक गंगाराम निसर्गंध याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.