शिक्षकास मारहाण; आरोपीस एक वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:44+5:302021-03-25T04:31:44+5:30
दत्ता अभिमन्यू शिनगारे, रा. आवसगाव, ता. केज असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, २५ जुलै ...
दत्ता अभिमन्यू शिनगारे, रा. आवसगाव, ता. केज असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाची हकीकत अशी की, २५ जुलै २०१४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आवसगाव येथे गावचे सरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा सुरू असताना दत्ता अभिमन्यू शिनगारे शाळेत आले. तेथे उपस्थित असणारे शिक्षक अजय मधुकर काळे यांच्याशी त्यांनी हुज्जत घातली. शाळेच्या बांधकामाचा हिशेब तू मला दे असे म्हणत त्यांनी काळे यांची गचांडी धरून मारहाण केली. याप्रकरणी शिक्षक अजय मधुकरराव काळे यांच्या फिर्यादीवरून दत्ता शिनगारे याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२२, ५०४, भादंवि अन्वये गुन्हे नोंद झाला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आले. न्या. सी. के. चौंदते यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. आरोपीविरुद्धचे पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी दत्ता अभिमन्यू शिनगारे यास एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले.