बहिणीवरील प्रेमाचा राग; काेयत्याने वार करून तरुणाची हत्या; अंबाजोगाईत भरदिवसा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 20:01 IST2025-04-02T20:00:42+5:302025-04-02T20:01:19+5:30
याप्रकरणी तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बहिणीवरील प्रेमाचा राग; काेयत्याने वार करून तरुणाची हत्या; अंबाजोगाईत भरदिवसा थरार
अंबाजोगाई : बहिणीवर प्रेम करणाऱ्या युवकाला धडा शिकविण्यासाठी त्याच्यावर काठी व कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली. मंगळवारी सकाळी शहरातील पोखरी रोडवर हा थरार घडला. जखमी तरुणाला तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले; परंतु अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांविरोधात अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजकुमार साहेबराव करडे (वय २५, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजकुमार हा सकाळी पोखरी रोड परिसरात एका हॉटेलसमोर उभा होता. यावेळी बहिणीवर प्रेम करणाऱ्या राजकुमार याला धडा शिकविण्यासाठी मुलीचा भाऊ वेदांत वैजनाथ शिंदे व आदिनाथ भांडे (रा. सारडानगरी) यांनी राजकुमारला हॉटेलवर गाठले. कोयत्यासह धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी केशाबाई साहेबराव करडे (रा. येल्डा रोड, गवळीपुरा, अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचे वडील वैजनाथ शिंदे, भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले करीत आहेत.
शॉर्ट फिल्म बनविताना प्रेम
राजकुमार हा शॉर्ट फिल्म बनविण्याचे काम करत होता. त्याची व अल्पवयीन मुलीची तेथेच ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीच्या वडिलांना हे प्रकरण मान्य नव्हते. त्यांनी राजकुमारला मुलीपासून दूर राहा अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली होती. परंतु तरीही राजकुमारमध्ये सुधारणा झाली नाही. याचाच राग मनात धरून राजकुमारची भरदिवसा हत्या करण्यात आली.