बीड उत्तरपत्रिका जळीत प्रकरणः 'त्या' विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनुसार देणार गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 04:18 PM2018-05-29T16:18:32+5:302018-05-29T16:18:32+5:30
बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे.
बीड- बीडमध्ये उत्तर पत्रिकेच्या जळीत प्रकरणात विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीनं गुण देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. केज येथे 10वी व 12वी परीक्षेच्या जवळपास 1303 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना 3 मार्च 2018 रोजी रात्री 8च्या सुमारास घडली होती.
या उत्तरपत्रिका जळाल्या की जाळल्या याबाबत साशंकता असून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या घटनेमुळे वर्षभर अभ्यास करून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. नेहमीप्रमाणे केंद्रावरून उत्तरपत्रिका गट साधन केंद्रावर आल्यानंतर बारावीच्या गणिताच्या 1199 तर दहावीच्या 113 उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्याकरीता सील करून ठेवण्यात आल्या होत्या. नंतर या उत्तरपत्रिका रूममध्ये झाकून ठेवून व रूमला सील करून गटशिक्षणाधिकारी व इतर कर्मचारी निघून गेले. त्यानंतर अचानक त्या उत्तर पत्रिका आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.