बीडमध्ये भर दुपारी साडेपाच लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:38 AM2018-04-24T00:38:59+5:302018-04-24T00:38:59+5:30
अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अतिशय वर्दळीच्या अन गजबजलेल्या अण्णा भाऊ साठे चौकातून एका कारची काच फोडून रोख ५ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ही रक्कम लंपास केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करीत सर्व ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
श्रीराम शंकरलाल झंवर (रा. नवगण राजुरी) यांची पार्वती जिनिंग अॅन्ड प्रेसिंग फॅक्टरी आहे. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी ते सकाळी ९.३० वाजता घराबाहेर पडले. बीड शहरातील मोंढा रोड भागातील एसबीआय बँकेतून त्यांनी ११ वाजेच्या सुमारास ६ लाख रुपये काढले. त्यानंतर तेथून ते आपल्या कार क्र. (एमएच२३/एडी३५४२) ने छत्रपती बँकेच्या शेजारी असलेल्या बंडू माने यांच्या दुकानात गेले. येथे त्यांनी खरेदी केलेल्या कापसाचे १ लाख रुपये माने यांना दिले. सर्व काम आटोपल्यानंतर ते चालक अशोक म्हेत्रे याच्यासोबत सुभाष रोडने राजुरी या आपल्या गावाकडे निघाले. परंतु झंवर यांना उपवास असल्याने ते अण्णा भाऊ साठे चौकात कार उभी करुन आंब्याचा रस पिण्यासाठी गेले. हीच संधी साधून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अवघ्या काही क्षणात कारच्या डाव्या बाजुची काच फोडून आत ठेवलेल्या पैशाच्या दोन बॅग लंपास केल्या. हा प्रकार चालक म्हेत्रे गाडीजवळ आल्यानंतर समजला.
त्याने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक जमा झाले त्यांनी ही माहिती तत्काळ शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी शहराबाहेर जाणाºया सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली. परंतु सायंकाळपर्यंत पोलिसांच्या हाती चोरटे लागले नव्हते. श्रीराम झंवर या व्यापाºयाच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक बिराजदार हे याचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी गस्त वाढवावी
पोलिसांनी केवळ रात्रीच्या वेळेस गस्त न घालता अशा घटना टाळण्यासाठी दिवसाही गस्त वाढविण्याची गरज आहे. साध्या कपड्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करुन बाजारपेठेच्या ठिकाणी त्यांना गस्त घालण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे. नागरिकांनीही गस्तीवर असणा-या पोलिसांशी संवाद साधून त्यांना सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पाळत ठेवून चोरीचा संशय
झंवर या व्यापाºयाने बँकेतून पैसे काढल्याची माहिती या चोरट्यांना असावी, त्यानंतरच त्यांनी त्यांचा पाठलाग केला असावा किंवा जवळच्याच एखाद्या व्यक्तीने त्याबद्दल माहिती ‘लिक’ केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने त्यांनी तपासही सुरू केल्याचे सांगण्यात येते.
एलसीबी, एडीएस कामाला
सीसीटीव्ही फुटेज काढून रेकॉर्डवरील हे गुन्हेगार आहेत का? याची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेने केली. तसेच एलसीबी व दरोडा प्रतिबंधकचे अधिकारी, कर्मचारी तात्काळ चोरांच्या शोधासाठी कार्यालयाबाहेर पडले. परंतु सायंकाळपर्यंत त्यांच्या हातीही निराशाच होती.
पोलिसांकडून नाकाबंदी आणि शोध मोहीम
बॅग लंपास झाल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यांनी तात्काळ हा प्रकार अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे व उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या कानावर घातला. त्यांनी तात्काळ शहराबाहेर जाणाºया सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. तसेच विशेष पथकेही शहरात शोध मोहिमेसाठी रवाना केली. परंतु हाती काहीच लागले नाही.
सुभाष रोडवर वाहनांच्या रांगा
झंवर यांची कार साठे पुतळ्याच्या पाठीमागे डाव्या बाजूस उभी होती. कारमागे वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. तसेच चोरटा बॅग घेऊन पसार होताना अवघ्या दोन फुटांवर चोरट्यांच्या आजूबाजूने वाहनांचा गराडा होता. एवढी गर्दी असतानाही चोरट्यांनी पोबारा केला.