बीड बसस्थानकात महिला प्रवाशांची वाहकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:22 AM2018-05-11T00:22:50+5:302018-05-11T00:22:50+5:30

थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली.

Beed bus driver stabbed the passenger vehicle driver | बीड बसस्थानकात महिला प्रवाशांची वाहकास मारहाण

बीड बसस्थानकात महिला प्रवाशांची वाहकास मारहाण

Next
ठळक मुद्दे थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. गुन्हा दाखल होऊ करु नये म्हणून काही राजकीय पुढाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन वाहकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

बीड : थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबविली नाही, याचा राग मनात धरून तीन महिला प्रवाशांनी वाहकास बदडले. ही घटना शेकडो प्रवाशांसमोर बीड बसस्थानकात गुरूवारी सकाळी घडली. जखमी चालकावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे हे निवृत्त सहायक फौजदाराची पत्नी, दोन मुली व जावई असल्याचे सांगण्यात आले. या सर्व घटनेमुळे रापमच्या कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष शिवाजी माळी (रा. बार्शी) असे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे. बार्शी आगाराची बस (एमएच १४ टीई ३२३१) ही बार्शीहून शेगावला जात होती. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. बार्शी नाक्याच्या पुढे आल्यावर थांबा नसलेल्या ठिकाणी देवीबाई भिमराव लहाने (रा.स्वराज्यनगर, बीड) या महिला प्रवाशाने बस थांबवण्यास वाहकाला सांगितले. परंतु थांबा नसल्याने बस थांबविता येत नसल्याचे माळी यांनी सांगितले.

यावर संतापलेल्या महिला प्रवाशांनी वाहकाच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तिने आपली मुलगी रत्नकन्या जाधव, ज्योती हराळे व जावई सुहास हिराळे यांना फोनवरुन बीड बसस्थानकात बोलावून घेतले. माळी हे बसमधून खाली उतरताच त्यांना मारहाण करण्यात आली.विशेष म्हणजे या ठिकाणी रापमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. परंतु महिला असल्याने त्यांना धरण्यासाठी पुढे कोणीही धजावले नाही. याचवेळी जवळ असलेल्या महिला वाहकांनी मारहाण करणाऱ्या महिला प्रवाशांना बाजूला घेतले आणि जखमी माळी यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगारप्रमुख एन. पवार, स्थानकप्रमुख बनसोडे यांनी रुग्णालयात धाव घेऊन वाहकाची विचारपूस केली. सायंकाळी उशिरा संतोष माळी या वाहकाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन महिला व एका पुरूषाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक सतिष जाधव हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच ज्योती हराळे, सुहास हराळे व रत्नकन्या जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर देवीबाई लहाने यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेत्यांचा दबाव : संघटनांकडून आधार
गुन्हा दाखल होऊ करु नये म्हणून काही राजकीय पुढाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन वाहकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहक भयभीत झाल्याचे दिसले. परंतु कामगार सेनेचे विभागीय सचिव राहूल बहिर, इंटकचे प्रादेशिक सचिव बबन वडमारे यांनी रूग्णालयात धाव घेत माळी यांना आधार दिला. त्यानंतर सायंकाळी गुन्हा नोंद झाला.

तिकिटांचे नऊ हजार रुपये चोरीला
बार्शीहून निघाल्यानंतर प्रवाशांकडून माळी यांनी तिकिटे घेतली. त्याचे जवळपास नऊ हजार रुपये जमा झाले होते. मारहाणीच्या घटनेदरम्यान ही रक्कम गायब झाल्याचे माळी यांचे म्हणणे आहे. परंतु ठाण्यात याची नोंद नाही.

चार दिवसांपासून सीसीटीव्ही बंद
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वीच बीड बसस्थानकात नऊ सीसीटीव्ही बसविण्यात आले. परंतु तांत्रिक अडचणींमुळे मागील चार दिवसांपासून हे कॅमेरे बंद आहेत. दुरुस्तीचे काम सुरु असल्याचे एन. पवार यांनी सांगितले. बंद सीसीटीव्हीमुळे स्थानकातील मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला नाही हे दुर्दैव.

Web Title: Beed bus driver stabbed the passenger vehicle driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.