बीड बसस्थानकात खिसेकापू सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:20 AM2019-04-30T01:20:46+5:302019-04-30T01:21:23+5:30
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खिसेकापू पुन्हा सक्रिय झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खिसेकापू पुन्हा सक्रिय झाले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना कळू न देता त्यांच्या खिशातील रक्कम व मोबाईल चोरीच्या घटना पुन्हा सुरु झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी बसस्थानकात थांबलेल्या दोन प्रवाशांकडील किमती ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
राहुल प्रकाश जाधव (३१, रा. डोरलेवाडी, ता. बारामती) हे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील बसस्थानकात बसमध्ये बसत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल व दुसºया एका प्रवाशाच्या खिशातील १० हजार रुपयांची रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज हातोहात लंपास केला. या प्रकरणी राहुल जाधव यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. म.पो.ना.सौंदरमल या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पोलीस असतानाही प्रवाशांची लूटमार होऊ लागल्याने बंदोबस्तावरील पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट होत आहे.