बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे आवाहन ; संयम बाळगा, शांतता ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:41 PM2018-01-02T23:41:35+5:302018-01-02T23:49:11+5:30

कोरेगाव-भिमा प्रकरणाचे मंगळवारी जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. बीड शहरात सैरभैर पळणा-या तरुणांनी वाहनांची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. काही दुकानांवरही दगडफेक झाली. त्यामुळे शहरात सकाळी दहा ते दुपारी २ या दरम्यान तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Beed Collector, Appeals to the Superintendent of Police; Have patience, keep calm! | बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे आवाहन ; संयम बाळगा, शांतता ठेवा!

बीड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे आवाहन ; संयम बाळगा, शांतता ठेवा!

googlenewsNext
ठळक मुद्देभीमा कोरेगाव प्रकरणाचे तीव्र पडसाद

बीड : कोरेगाव-भिमा प्रकरणाचे मंगळवारी जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. बीड शहरात सैरभैर पळणा-या तरुणांनी वाहनांची तोडफोड करीत मोठे नुकसान केले. काही दुकानांवरही दगडफेक झाली. त्यामुळे शहरात सकाळी दहा ते दुपारी २ या दरम्यान तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सायंकाळपर्यंत २१ संशयितांना ताब्यात घेतले. जिल्हाभरात संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात केला आहे. विशेष पथके कर्तव्यावर असल्याने दुपारनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह आणि पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले.

कोरेगाव-भिमा प्रकरणाचे पडसाद उमटण्यास सोमवारी रात्रीपासूनच सुरूवात झाली. माजलगावमध्ये तीन तर बीडमध्ये एक बस फोडली. त्यानंतर रात्रभर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ५०० ते ६०० लोकांचा जमाव नगर रोडवर जमा झाला. काही लोक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले. एवढ्यात जमाव पांगला. काही लोक नगर रोडने धावले तर काही सामाजिक न्याय भवनात गेले. सामाजिक न्याय भवनात गेलेल्या सर्वांना गेट बंद करून आतमध्ये शांत राहण्याचे आवाहन केले. परंतु काही लोक माने कॉम्प्लेक्स परिसरात धावले. त्यानंतर मात्र परिस्थिती बिघडली. माने कॉम्प्लेक्स परिसरातील तीन दुकानांवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. तसेच रस्त्यांवर उभी असलेली चारचाकी वाहनेही फोडली.

या भागातून कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणा-या तीन ट्रॅव्हल्सच्या काचाही फोडल्या. यात मोठे नुकसान झाले. जमाव एवढ्यावरच थांबला नाही. पुढे केएसके महाविद्यालय परिसरातही दगडफेक केली. जमावातील काहींनी एक दोन दगड महाविद्यालयाच्या इमारतीवरही भिरकावले. यामुळे विद्यार्थी भयभीत झाले तर व्यापा-यांमध्येही दहशतीचे वातावरण होते. त्याचवेळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, नानासाहेब लाकाळ यांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, सकाळपासूनच शहरातील मोंढा, हिरालाल चौक, आदर्श मार्केटसह इतर व्यापारपेठा बंद होत्या. दरम्यान भाजीमंडई भागातून जमाव आला, गेला परंतु,फळे, भाजी विक्रेत्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत संयमही पाळला. विविध घटनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये दिवसभर भितीचे वातावरण होते.

डीवायएसपींची गाडी फोडली
गस्त घालत असताना माळीवेस भागात जमाव जमला होता. हा जमाव पांगवताना आणि शांतता राखण्याचे आवाहन करीत असतानाच अज्ञात व्यक्तीने उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या गाडीवर दगड मारून काच फोडला. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने जखमी झाले नाही.

बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल
बसवर दगडफेकीच्या घटना घडत असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दुपारी १२ वाजेपासून रात्री सात वाजेपर्यंत बससेवा ठप्प करण्यात आली होती. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. बीड बसस्थानकात सर्वत्र बसेसच्या रांगा लागल्या होत्या. वातावरणाचा अंदाज घेऊन रात्री सात वाजता पोलीस संरक्षणात काही बसेस रवाना झाल्या.

 माजलगावात सहा दुकानांवर दगडफेक
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास माजलगाव मोंढा भागात काही दुकानदारांनी दुकान उघड्या ठेवल्याने काही युवकांनी दगडफेक सुरु केली. यात सहा-सात दुकानांच्या काचा फुटल्या. दरम्यान मोंढा चौकात गजबजलेल्या वस्तीत एकही पोलीस नसल्याने व्यापाºयांनी या घटनेचा बैठक घेवून निषेध व्यक्त केला. यावेळी किराणा संघाचे अध्यक्ष संजय सोळंके, गणेश लोहीया, अनंत रूद्रवार, नंदलाल मेहता, लक्ष्मीकांत झिंझुर्के, कपील पगारीया आदी व्यापारी उपस्थित होते. असे प्रकार वारंवार होत राहील्यास आम्ही बेमुदत बंद पुकारणार असल्याचे संजय सोळंके यांनी सांगितले.

   दगडफेकीत उपनिरीक्षक सोनार किरकोळ जखमी
 शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भूषण सोनार हे मंगळवारी गस्त घालत होते. याचवेळी दगडफेक होत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी जमावाला पांगवण्यासाठी धाव घेतली असता त्यांच्यावरही दगडफेक झाली. त्यांनी प्रसंगावधान राखत दगड चुकविला. मात्र दुसºयाने मारलेला दगड सोनार यांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.

२१ संशयित ताब्यात
घटना घडल्यानंतर हल्लेखोरांच्या मागावर पोलीस होते. शिवाजीनगर, बीड ग्रामीण व पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष बंदोबस्त लावला होता. याचवेळी काही हल्लेखोर दगडफेक करताना दिसले. त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्वांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. येथे पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि पाळवदे यांनी त्यांची चौकशी केली.
यावेळी ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला होता. पोलीस  ठाण्याबाहेरही पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला.

   बससह ३०
   वाहनांची तोडफोड
 राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससह इतर खाजगी अशा २५ ते ३० वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. या तोडफोडीत वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

Web Title: Beed Collector, Appeals to the Superintendent of Police; Have patience, keep calm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.