बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची बदली; प्रेरणा देशभ्रतार येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 11:49 PM2019-12-04T23:49:58+5:302019-12-04T23:51:57+5:30
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर प्रेरणा देशभ्रतार यांची बीडच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देशभ्रतार या बीडच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असणार आहेत. बुधवारी यासंदर्भातील आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढले आहेत.
२१ फेब्रुवारी २०१९ रोजी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. अवघे ९ महिने ८ दिवसाच्या कार्यकाळामध्ये विविध लोकोपयोगी निर्णय जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी घेतले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे जीवनमान उंचावणे, बँकांकडून शेतकऱ्यांना चांगली वागणूक मिळावी यासाठी तसेच त्यांच्या अनुदानाची रक्कम तात्काळ मिळावी यासाठी त्यांनी वेळोवेळी सूचना संबंधितांना दिल्या होत्या. याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १ हजार टँकर व ६०० पेक्षा अधिक चारा छावण्यांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील नागरिकांना आणि शेतक-यांसह पशुधनास दिलासा मिळाला.
भ्रष्टाचार करणाºया छावणीचालकांवर राजकीय हस्तक्षेप न जुमानता कारवाई केली होती. यामुळे गैरप्रकारांना आळा बसून शासनाचे लाखो रुपये वाचले होते. मागील काही दिवसात ‘या आपले शहर घडवूया’ हा उपक्रमातून शहरातील स्वच्छता मोहीम त्यांनी हाती घेतली होती.
स्वत: हातात झाडू घेऊन यंत्रणेसह सामाजिक संघटना, संस्थांना यात सहभागी करून घेतले होते. शहरातून वाहणाºया बिंदुसरा नदीच्या पात्राची स्वच्छता करून हे पात्र पर्यटनाचे स्थळ बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते.
लोकसभा, विधानसभा निवडणुका नियोजनबद्ध
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय हे बीड येथे रुजू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचे कामकाज सुरु झाले होते.
त्याचे योग्य नियोजन करुन शांततेत निवडणुका पार पाडल्या. त्यानंतर विधानसभा निवडणूक प्रक्रिया देखील सर्व मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखत शांततेत पार पडली.
अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस त्यांनी निर्बंध आणले. तसेच वाळू वाहतूक करणा-या सर्व गाड्या जीपीएससोबत संलग्न केल्या.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांसाठी आखली योजना
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांची संख्या आहे. या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी व त्यांच्या कुटुंबियांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आस्तिककुमार पाण्डेय यांनी ३१ प्रश्नावलीची योजना आखली होती. तिचे काम तालुकास्तरावर सुरु आहे.