बीड जिल्हाधिकारी यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:50 PM2019-10-19T23:50:07+5:302019-10-19T23:50:52+5:30
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला.
बीड : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात २१ आॅक्टोबर १९ रोजी मतदान होत असून यासाठी पोलीस बंदोबस्त तसेच मतदानाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे बाबत केलेल्या तयारीचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती बैठक प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, निवडणूक निरीक्षक (पोलीस) बाबूलाल मीना, निवडणूक निरीक्षक प्रांजल यादव, इस्त्राइल इंगटी, सारादिन्दू चौधरी, निवडणूक खर्च निरीक्षक रवी कुमार, कल्याण रेवेल्ला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर उपस्थित होते. यावेळी विधानसभा मतदार संघाशी संबंधित उपविभागीय पोलिस अधिकारी पोलीस उपअधीक्षक तसेच सीआरपीएफ कमांडंट आणि झारखंड पोलीस विभागाचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कालावधीत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दला समवेत सहा मतदार संघांच्या मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी पर्यंत केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या आणि झारखंडच्या ४ कंपन्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार केंद्र निहाय बंदोबस्त आणि या भागातील पोलीस बंदोबस्ताचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच या काळात कारवाईसाठी पोलीस विभागाच्या नियोजनाची माहितीही यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी पाण्डेय म्हणाले, निवडणुकीसाठी जिल्ह्यात उपलब्ध झालेले अतिरिक्त सुरक्षा दल आणि पोलीस दलाने समन्वयाने काम केले जावे. निर्देशानुसार मतदान केंद्राजवळ मतदारांना मोबाईल फोन अथवा कॉर्डलेस फोनचा वापर करण्यास व मतदान केंद्रात घेऊन जाण्यास बंदी असल्याने तेथे नियुक्त यंत्रणेने त्याबाबत काळजी घ्यावी.
२३८ मतदान केंद्रांचे वेब कास्टिंग होत असून जिल्हास्तरीय वॉर रूम मधून परिस्थितीवर नियंत्रण राखले जाईल. संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवून आवश्यकता भासल्यास कमीत-कमी कालावधीत तेथे पोलीस दल पोहोचवले जावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे सांगितले.