बीडमध्ये कॅरीबॅगची साठवणूक करणा-या व्यापा-यावर गुन्हा दाखल, काही व्यापा-यांनी दुकान बंद करून काढला पळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:00 PM2017-10-28T13:00:53+5:302017-10-28T13:04:15+5:30
शहरातील पेठबीड भागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा साठा आढळल्याप्रकरणी संतोष फॅन्सी प्लास्टिक सेंटरचे मालक संतोष टवानी या व्यापा-यावर पेठबीड पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : शहरातील पेठबीड भागात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा साठा आढळल्याप्रकरणी संतोष फॅन्सी प्लास्टिक सेंटरचे मालक संतोष टवानी या व्यापा-यावर पेठबीड पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. दुस-या दिवशीही पालिकेने कॅरीबॅग जप्तीची मोहीम सुरूच ठेवली. धास्तावलेल्या काहींनी दुकान बंद करुन पळ काढला.
बीड नगर परिषदेच्या वतीने प्लॅस्टिक कॅरीबॅगमुळे कचरा निर्माण होऊ नये, नाल्यांमध्ये जाऊन नाल्या तुंबू नयेत, जनावरांच्या खाद्याबरोबर पोटात गेल्यान त्रास होऊ नये इ. उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी तब्बल अडीच क्विंटल कॅरीबॅग जप्त केल्या होत्या.
शुक्रवारी ही मोहीम सुरूच ठेवली. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते बलभीम चौकापर्यंत, तसेच पेठबीड भागातील दुकानांवर छापे टाकून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग जप्त केल्या. ‘लोकमत’ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र दहशत निर्माण झाली होती. अनेकांनी स्वत:हून कॅरीबॅग पालिकेच्या स्वाधीन केल्या.मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख पी.टी. तिडके, अभियंता श्रद्धा गर्जे, स्वच्छता निरीक्षक आर.एस. जोगदंड, अविनाश धांडे, भगवान कदम, राम शिंदे आदींनी ही कारवाई केली.
पेठबीडमधून साठा जप्त
पेठबीड भागातील संतोष फॅन्सी प्लास्टिक सेंटरवर गुरुवारी दुपारी छापा टाकून १ क्विंटल कॅरीबॅगचा साठा जप्त केला होता. हाच धागा पकडून व्यापारी संतोष टवानी यांच्याविरुद्ध पेठबीड पोलीस ठाण्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा साठा ठेवून विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. स्वच्छता निरीक्षक आर.एस. जोगदंड यांनी पेठबीड ठाण्यामध्ये फिर्याद दिली.
व्यापा-यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने हाती घेतलेल्या मोहिमेला व्यापा-यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जे व्यापारी सहकार्य न करता कॅरीबॅगचा साठा करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.
- डॉ. धनंजय जावळीकर, मुख्य अधिकारी, न.प.
यापुढेही ही मोहीम कायम राहणार
शुक्रवारी ५० किलो कॅरीबॅग वेगवेगळ्या दुकानांतून जप्त केल्या. दिवसभर ही मोहीम सुरू होती. यापुढेही ही मोहीम कायम राहणार आहे. अनेक भागात दुकानदारांनी स्वत:हून कॅरीबॅग आमच्याकडे सुपूर्द केल्या.
- व्ही.टी. तिडके, स्वच्छता विभाग प्रमुख