बीड पालिकेने कर्ज थकविले, मंत्री बँकेने घेतला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा ताबा
By सोमनाथ खताळ | Published: June 16, 2023 06:01 PM2023-06-16T18:01:32+5:302023-06-16T18:01:51+5:30
पालिकेविरोधात संताप; कर्ज परतफेड न केल्यास आठवडाभरात बँक नाट्यगृहाचा करणार लिलाल
बीड : शहरातील एकमेव असलेले सांस्कृतीक मंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा ताबा द्वारकादास मंत्री बँकेने शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता घेतला आहे. बीड पालिकेने कर्ज परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील आठ दिवसांत कर्ज न भरल्यास या नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार आहे. या कारवाईमुळे बीड पालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
२००६ साली बीड पालिकेने द्वारकादास मंत्री बँकेकडून पालिकेच्या मुख्य इमारतीसाठी १ कोटींचे कर्ज घेतले होते. गॅरंटर म्हणून बाबुराव दुधाळ आणि किशोर काळे हे दोघे होते. तर तारण म्हणून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ठेवले होते. पालिकेने सुरूवातीचे काही दिवस कर्ज परत केले. परंतू २०१९ पासून एकही हप्ता भरला नाही. २३ मार्च २०२३ रोजी बँकेने पालिकेला नोटिस बजावली होती. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांचीही भेट घेतली. परंतू यावर मुख्याधिकाऱ्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
उलट काय करायचे ते करा? अशी भाषा वापरल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यावर बँकेच्या अधिकाऱ्यांनी सेक्यूरीटायझेशन ॲक्ट २००२ अन्वये तारण ठेवलेल्या नाट्यगृहावर आपला ताबा करत नोटिस लावली. तसेच आठवडाभरात १ कोटी १ लाख १ लाख ४६ हजार ९४ रूपये एवढे कर्ज परत न केल्यास या नाट्यगृहाचा लिलाव केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या कारवाईने मात्र, खळबळ उडाली असून पालिकेचा आणखी गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.