मिरवणुकीत तलवारीसह हिरोगिरी, व्हायरल फोटोवरून पोलिसांनी घडवली तुरुंगवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 04:21 PM2022-02-21T16:21:15+5:302022-02-21T16:21:55+5:30

व्हायरल फोटोवरून गुन्हे शाखेची कारवाई

Beed crime branch police arrested youth on viral photo shows sword in hand | मिरवणुकीत तलवारीसह हिरोगिरी, व्हायरल फोटोवरून पोलिसांनी घडवली तुरुंगवारी

मिरवणुकीत तलवारीसह हिरोगिरी, व्हायरल फोटोवरून पोलिसांनी घडवली तुरुंगवारी

Next

बीड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या दुचाकी रॅलीत हातात तलवार घेऊन स्टंटबाजी करणे एका तरुणाला भलते अंगलट आले. मिरवणुकीतील स्टंटबाजीच्या व्हायरल फोटोवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.

गणेश उर्फ टिनू गोरख शिराळे (२२, रा. स्वराज्यनगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. १९ रोजी शिवरायांच्या जयंती निमित्त काढलेल्या रॅलीत दुचाकीवर उभे राहून हातात तलवार घेऊन गणेश शिराळे याने हिरोगिरी केली होती. याचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता. दरम्यान, २० रोजी देखील तलवार जवळ बाळगून  तो दहशत निर्माण करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पो. नि. सतीश वाघ यांना मिळाली होती, त्यावरून त्यांनी उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, विकास वाघमारे, मनोज वाघ, शेख नसीर, प्रसाद कदम, रामदास तांदळे यांचे पथक रवाना केले.

बार्शी रोडवरील एका खासगी हॉस्पिटलसमोरुन सायंकाळी त्याला धारदार तलावरीसह ताब्यात घेण्यात आले. पोहेकॉ मनोज वाघ यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक बाळराजे दराडे करत आहेत.

Web Title: Beed crime branch police arrested youth on viral photo shows sword in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.