बीड जिल्हा बॅँकेला २ कोटी ६ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 11:27 PM2019-09-30T23:27:46+5:302019-09-30T23:28:18+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २ कोटी ६ लाख रुपये संचित नफा झाल्याची माहिती अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला २ कोटी ६ लाख रुपये संचित नफा झाल्याची माहिती अध्यक्ष आदित्य सारडा यांनी दिली.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आदित्य सारडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी बँकेचे सभासद, शेतकरी व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या सभेत आदित्य सारडा यांनी बँकेच्या संचालक मंडळाने अहवाल वर्षामध्ये केलेल्या कामकाजाचा आढावा सभेसमोर विशद केला. ते म्हणाले, ३१ मार्च २०१९ अखेर वसूल भाग भांडवल ५७ कोटी ९४ लाख इतके आहे. बॅँकेकडे ६२४ कोटी १२ लाखाच्या ठेवी असून ३३५ कोटी ५६ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. १०८१ कोटी ६४ लाख एवढे कर्जे असून बँकेस २ कोटी ६ लाख रूपये एवढा संचित नफा झालेला आहे. या आकडेवरुन बँक सक्षम होत असल्याचे निदर्शनास येते. वैधानिक लेखा परिक्षणामध्ये बँकेस ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. ही बँकेसाठी गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. बँकेने ग्राहकांसाठी एनईएफटी, आरटीजीएस, रुपे डेबीट कार्ड, केसीसी क्रेडीट कार्ड, एसएमएस अलर्ट, ई-कॉम. इ. सुविधा सुरु केल्या आहेत. त्यामुळे शासनाकडून बँकेस प्राप्त होणारे विविध प्रकारचे अनुदान, पीक विमा नुकसान भरपाई, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, गॅस आदी अनुदान हे लाभधारकांच्या खाती थेट वर्ग होत आहेत व तत्परतेने सदरील रकमेचे वाटप करीत आहे.
या सभेस ज्येष्ठ संचालक साहेबराव थोरवे, जिल्हा उपनिबंधक शिवाजीराव बडे, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस. देशमुख, उपव्यवस्थापक आर.व्ही. उबाळे, प्र.उप व्यवस्थापक के.यु. आघाव उपस्थित होते. उपाध्यक्ष गोरख धुमाळ यांनी आभार मानले.