बीड जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याला फुलकिडे तर सोयाबीनला अळीचा शाप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:05 PM2018-09-13T19:05:25+5:302018-09-13T19:06:55+5:30
खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.
बीड : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या बोंडअळी तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन पिकावर शेंगातील अळी मोठ्या प्रमाणावर दिसत असल्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कृषी विभागाकडून जिल्हाभरात पिकांवरील कीड, रोग, अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. शेतकऱ्यांसमोर बोंडअळी रोखण्याचे आवाहन आहे. ज्या महसूल मंडळामध्ये अधिक प्रमाणात बोंडअळी, फुलकिडे व शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांना फवारणी करताना औषधांचे प्रमाण, मिश्रण कसे करावे इ. विषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
बोंडअळीनंतर फुलकिड्यांचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे हे कीडे कापसाच्या पानातील रस शोषून घेतात. परिणामी पानाचा आकार द्रोणासारखा होत असून, पाने लालसर रंगाची होत आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला की काय, अशी शंका येत आहे.
पानातील रस शोषून घेतल्यामुळे कापूस पिकाची वाढ खुंटली आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना उपाययोजना सांगितल्या आहेत. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे पिके येतील काय ? तसेच फवारणीवर झालेला खर्च वाया जातो काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
सोयाबीन पिकावर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यामुळे कापसासोबत सोयाबीनचेही नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोयाबीनच्या शेंगा येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळापासूनच कीटकनाशक फवारणी तसेच प्रतिबंधात्मक उपाय केले तर शेंगातील अळीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो, असे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
फुलकिडे रोखण्यासाठी उपाययोजना
फेप्रोनील ३० एमएल १० लिटर पाण्यामध्ये मिसळावे. या मिश्रणामध्ये १२ : १६ : ०० हे खत २०० ग्रॅम तसेच मॅग्नेशियम ५० ग्रॅम फवारणी केल्यानंतर पानावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव थांबून पाने लालसर होत नाहीत. सोयाबीन पिकावरील शेंगातील अळी रोखण्यासाठी इमामेक्टीनबेंझाईन ३ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव व शिरूरचे कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी दिली. अधिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग व विद्यापीठाशी संपर्क साधण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.