बीडमध्ये शेतकरी संघटनेचा जिल्हा उपनिबंधकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 01:25 AM2018-09-25T01:25:05+5:302018-09-25T01:25:19+5:30
शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांना घेराव घातला. तब्बल पाच तास सर्व आंदोलक त्यांच्या कक्षात बसून होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील हंगामात हमीभावाने खरेदी केलेल्या तूर, हरभरा, सोयाबीन, उडदाचे चुकारे तात्काळ द्यावेत, ही रक्कम मिळण्यास विलंब केल्याबद्दल यंत्रणेतील संबंधितांवर गुन्हे दाखल करेपर्यंत कार्यालयातून हलणार नसल्याचा पवित्रा घेत शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी,सदस्यांनी जिल्हा उपनिबंधक एस. पी. बडे यांना घेराव घातला. तब्बल पाच तास सर्व आंदोलक त्यांच्या कक्षात बसून होते.
हमीदराने शेतमाल खरेदी केल्यानंतर नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला २४ तासात पेमेंट अदा करणे आवश्यक आहे, नसता खरेदीदारावर गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र माजलगाव, धारूरसह सर्वच बाजार समित्यांमध्ये शासकीय केंद्रावर खरेदी केलेल्या मालाचे चुकारे शेतकºयांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच शेतमाल उतरुन घेण्याबाबत तसेच आधारभूत किंमतीनुसार मुगाची खरेदी करण्याबाबत बाजार समित्यांना निर्देश द्यावेत इ. मागण्या करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष कालीदास आपेट, जिल्हाप्रमुख अनुरथ काशीद (पूर्व विभाग), डॉ. अजिमोद्दीन शेख (पश्चिम विभाग), सर्व तालुका प्रमुख, अनंतराव शिंदे, सत्यनारायण आरडे, शेख अन्सार, परमेश्वर मिसाळ, सतीश रिंगणे, अशोक येडे, बबनराव काशीद, रामेश्वर गाडे आदी उपस्थित होते.