बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात बीड जिल्हा कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:54+5:302021-06-30T04:21:54+5:30
डाॅ. जे. एन. शेख सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ ...
डाॅ. जे. एन. शेख
सिरसाळा (जि. बीड) : उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाच्या सिरसाळा कनेक्शनमुळे बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सिरसाळ्यातील मूळ रहिवासी आणि दिल्लीत नोकरी करत असलेल्या इरफान शेखला (वय ३५) यू.पी. पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. इरफानसोबत मौलाना जहांगीर आणि उमर गौतम या दोघा मौलानांना २१ जून रोजी अटक केली असल्याची माहिती समाज माध्यमावरून व्हायरल झाली आहे.
धर्मांतर प्रकरणातील इरफान खान हा आरोपी बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा या गावचा रहिवासी असून, त्याचे प्राथमिक शिक्षण सिरसाळ्यात झाले. त्यानंतर इरफान हा परळीत शिकण्यासाठी होता. माध्यमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविद्यालयात झाले. बारावीनंतर तो मुंबईला शिक्षणासाठी गेला. चार वर्षांपासून तो केंद्र सरकारच्या चाईल्ड वेल्फेअरमधील साईन लँग्वेजसाठी काम करत होता. २०१५ साली परळीतील मुलीसोबत त्याचे लग्न झाले असून, त्यास मूलबाळ नाही. उच्च शिक्षण त्याने मुंबईला पूर्ण केलं आणि त्यानंतर तो दिल्लीला मागील चार वर्षांपासून काम करत होता. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खान याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकीची थाप मारत पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
हाच इरफान आता धर्मांतर प्रकरणात आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला आहे. इरफानचे नाव या सर्व प्रकरणांमध्ये आल्यानंतर शिरसाळा येथील त्याच्या नातेवाइकांना आणि भावांना चांगलाच धक्का बसलाय. इरफान असं काही करू शकत नाही, असा विश्वास त्यांना आहे. मात्र, अजूनही फारसे काही बोलणं झालं नाही. समाज माध्यमातूनच आम्हाला माहिती मिळाल्याचं इरफानचा भाऊ फुरखान पठाण यांनी बोलताना सांगितलं. चार वर्षांपासून तो सिरसाळ्यात आला नसल्याचीही माहिती त्यांनी दिली. इरफानला आई, दोन मोठे भाऊ आहेत.
===Photopath===
290621\29bed_15_29062021_14.jpg~290621\29bed_16_29062021_14.jpg
===Caption===
बीड जिल्हा कनेक्शन~बीड जिल्हा कनेक्शन