बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:39 PM2018-07-30T23:39:43+5:302018-07-30T23:40:01+5:30

मराठा आरक्षणासाठी परळीत सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तर सोमवारी केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन ३० जणांनी मुंडण केले. बीड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

Beed district continued its agitation | बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

Next
ठळक मुद्देपरळीत शांततेत आंदोलन सुरु; बीडमध्ये धरणे आंदोलन, धनेगावात मुंडण अन् रास्ता रोको

बीड : मराठा आरक्षणासाठी परळीत सुरु असलेले मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन तेराव्या दिवशीही सुरु होते. तर सोमवारी केज तालुक्यातील धनेगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन ३० जणांनी मुंडण केले. बीड येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपासून धरणे आंदोलन सुरु झाले. आंदोलनस्थळी ‘एक मराठा लाख मराठा’ ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ ‘आरक्षण आमच्या हक्काचे, ‘भाजप सरकारचे करायचे काय?’, ‘काकासाहेब शिंदे अमर रहे’ अशा विविध घोषणा देण्यात येत होत्या.

यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, माजी आ. बदामराव पंडीत, विलास बडगे, अरुण डाके, गणपत डोईफोडे, नरसिंग नाईकवाडे, विलास विधाते, अ‍ॅड. जगन्नाथ औटे, अ‍ॅड. शेख शफिक, अ‍ॅड. महेश धांडे, दिलीप गोरे, डॉ. योगेश क्षीरसागर, विनोद मुळूक, कुंदा काळे, कमल निंबाळकर, अनिता शिंदे, वैजनाथ तांदळे, रवि शिंदे, सखाराम मस्के, जयदत्त थोटे, बापूसाहेब डोके, बबन वडमारे, चंद्रसेन नवले, अंबादास गुजर, चंद्रसेन उबाळे, तानाजी कदम, शाहेद पटेल, खमरभाई, काकासाहेब जोगदंड, सुभाष सपकाळ, बापू माने, शेषेराव फावडे हनुमंत बोरगे, कचरु काशीद, अ‍ॅड. विष्णूपंत काळे, पांडुरंग गवते, कल्याण खांडे, चंद्रसेन नवले, संतराम घोडके तसेच मराठा बांधवांसह मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेकांची भाषणे झाली.

सरकारची नियत साफ नाही : जयदत्त क्षीरसागर
आर्थिक निकषावर आरक्षणाची चर्चा हा नवीन बागुलबुवा असून विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न आहे. याला ‘नवे गाजर’ म्हणा असा टोला लगावत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत या सरकारची नियत साफ नाही, आरक्षण प्रश्नी सरकारने काय दिवे लावले ? आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत मेगा भरती करू नये अशी मागणी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला कायम पाठिंबा असून आरक्षणाच्या विषयावर आपण सभागृहातही भूमिका मांडलेली आहे. मुंबईच्या मोर्चातही सहभाग घेतलेला आहे. आपली भूमिका व्यापक असून आपण दिखावा करत नाही असा टोलाही आ. क्षीरसागर यांनी राजकीय विरोधकांना लगावला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूने ज्या पद्धतीने आरक्षण दिले त्या मार्गाने जायला हवे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात असल्याने मागे हटून भागणार नाही असे आवाहन त्यांनी समाजाला केले. राजीनामे आणि भावनेच्या भरात प्रश्न सुटणार नाहीत. राजीनामे दिले तर उद्या विधानसभेत ठराव मांडल्यानंतर मत कोण देणार असे सांगून आत्महत्या करणाºया शेतकºयांत व माथाडी कामगारांमध्ये ९० टक्के मराठा समाज असल्याचे आ. क्षीरसागर म्हणाले.
या समाजाचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. त्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा प्रयत्न आहे. समाजाने शांततेत लाखोंचे मोर्चे काढले. मात्र, संयमाला मर्यादा असते, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा साप सोडणारा नव्हे, तर लढणारा होय...
बीड नगर परिषदेने मराठा आरक्षणासाठी सर्वात आधी ठराव संमत करुन पाठिंबा दिलेला आहे. पंचायत समितीनेही ठराव दिला. आरक्षण दिल्याशिवाय थांबायचे नाही असे सुभाष सपकाळ म्हणाले.
औरंगाबाद येथील सोमवारच्या घटनेचा संदर्भ देत अ‍ॅड. महेश धांडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५८ मोर्चे शांततेत काढले, मागील काही दिवसात सहा जणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यामुळे हा प्रश्न संवेदनशील बनला आहे. तर वैजनाथ तांदळे म्हणाले, मराठा समाज साप सोडणारा नाही, तर लढणारा आहे. अ‍ॅड. शेख शफिक म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनात मुस्लिम समाजाचा छोटा भाऊ म्हणून सक्रिय सहभाग नोंदविला जाईल.

धनेगाव येथे रास्ता रोको; तीस युवकांनी केले मुंडण
केज : मराठा आरक्षणासाठी केज तालुक्यातील धनेगाव फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी सकाळी राज्य सरकारचा दशक्रिया विधी घालून रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मराठा समाजाच्या ३० युवकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला.
काकासाहेब शिंदे यांस श्रद्धांजली वाहून आंदोलन सुरू झाले. आंदोलनात युसूफवडगाव, आनंदगाव, सारणी, पैठण, सावळेश्वर, जवळबन, आवसगाव, वाकडी, पाथरा, आनेगाव, धनेगाव, नायगाव, भालगाव, बावची, सादोळा, गोटेगाव, सुकळी,सुर्डी, सोनेसांगवी, माळेगाव, गांजी, बोबडेवाडी, सोनिजवळा, मोटेगाव, ढाकेफळ, कुंबेफळ येथील मराठा समाज सहभागी होता.
तहसीलदार अविनाश कांबळे यांना निवेदन दिले. यावेळी डीवायएसपी श्रीकांत डिसले, ना.तहसीलदार शेख, मंडळ अधिकारी भागवत पवार, दळवी उपस्थित होते.

पुळका असेल तर क्षीरसागरांनी विशेष अधिवेशनात बोलावे: मस्के
आ. जयदत्त क्षीरसागर यांना आरक्षणाचा पुळका असेल तर बीडमध्ये ढोंग कशासाठी? आरक्षणासाठी होणाºया विशेष अधिवेशनात जिल्हयातील तमाम मराठा समाजाला तुमची वाणी ऐकायला मिळू दया, असा टोला शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लगावला. ते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ३२ वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. विधीमंडळात अनेक लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, तारांकित प्रश्न उपस्थित झाले. मात्र, सभागृहात मराठा आरक्षणावर आ. क्षीरसागर यांनी कायम मौन बाळगल्याचा मस्के यांनी आरोप केला. महाराष्ट्रातील ५८ मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये कधीच सहभाग घेतला नाही. परळीतील ठिय्या आंदोलनाकडे सुध्दा आ. क्षीरसागरांनी पाठ फिरवली. सरकारला आरक्षण दयावेच लागेल. या आरक्षणाची चाहुल लागल्यानेच पुतणा मावशीचा जुना ‘ड्रामा’ क्षीरसागरांनी सुरु केल्याचे मस्के म्हणाले.

राजकीय नेत्यांना मज्जाव
धनेगाव फाट्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारचा दशक्रिया विधीसह रास्ता रोको आंदोलन सुरु असताना आंदोलनाच्या ठिकाणी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, रमेश आडसकर, केज पं.स. सभापती संदीप पाटील, ऋषिकेश आडसकर आले असता त्यांना सहभागी होण्यास आंदोलकांनी मज्जाव केला. रमेश आडसकर यांनी मांडलेल्या भूमिकेवरही आंदोलकांचे समाधान झाले नाही त्यामुळे नेत्यांना आल्या पावली परतावे लागले.

Web Title: Beed district continued its agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.