बीड जिल्हा रुग्णालयात तपासणी १० रुपयांत; औषधांसाठी मात्र हजारो रुपये !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:54 AM2017-12-21T00:54:27+5:302017-12-21T00:55:27+5:30
सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतात, हा समज बीड जिल्हा रूग्णालयात साफ चुकीचा ठरत आहे. तपासणी जरी दहा रूपयांत होत असली तरी औषधोपचाराला मात्र हजारो रूपये मोजावे लागत आहेत. सध्या रूग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतात, हा समज बीड जिल्हा रूग्णालयात साफ चुकीचा ठरत आहे. तपासणी जरी दहा रूपयांत होत असली तरी औषधोपचाराला मात्र हजारो रूपये मोजावे लागत आहेत. सध्या रूग्णालयात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य रूग्णांना सहन करावा लागत असून रूग्णालय परिसरातील मेडिकलधारकांना सोन्याचे दिवस आले आहेत.
जिल्हा रूग्णालयात येणारे ९० टक्के रूग्ण हे ग्रामीण भागातील आणि सर्वसामान्य कुटूंबातील असतात. १ व २ नंबरच्या कक्षात १० रूपयांची चिठ्ठी घेत तपासणीसाठी रांगेत उभा राहतात. दिवसभरात जवळपास दीड ते दोन हजार रूग्ण बाह्य रूग्ण विभागात आपल्या आजारांची तपासणी करून घेतात. येथील डॉक्टरही त्यांची प्रामाणिक तपासणी करतात. त्यानंतर त्यांना १० रूपयांची काढलेल्या चिठ्ठीवर औषधांची लांबलचक यादी लिहून दिली जाते आणि ८ क्रमांकाच्या खिडकीतून घ्या, असे सांगितले जाते. सरकारी दवाखाना असल्याने औषधांसाठी पैसे लागत नाहीत, म्हणून घरून केवळ तिकीटापूरते पैसे घेऊन आलेले रूग्ण व नातेवाईक ८ क्रमांकाच्या खिडकीसमोर रांगेत उभा राहतात.
फार्मासिस्टच्या हातात चिठ्ठी देताच ते ‘आपल्याकडे हे औषध नाही, बाहेरून घ्यावे लागेल’ असे सांगत चिठ्ठीवर फुल्ली मारून रिकामे होतात. रिकाम्या खिशाने आलेल्या रूग्ण व नातेवाईकांना काय करावे हे समजत नाही. चिठ्ठीवरील लांबलचक औषधांची लाईन पाहून त्यांना धडकी भरते. किती पैसे लागतील, याची माहिती नसते. रूग्णालयाच्या बाहेर असलेल्या मेडिकलवर गेल्यावर त्यांनी बिल हाती ठेवताच सर्वसामान्यांना चक्कर येत आहे.
एकीकडे रूग्णालयात दहा रूपयांत तपासणी होत असली तरी तुटवडा असल्याने औषधांसाठी हजारो रूपये मोजावे लागत आहेत. ही भयावह परिस्थिती मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाही आरोग्य विभाग मात्र सुस्तच आहे. जिल्हा रूग्णालय प्रशासनही आम्हाला औषधी खरेदी करण्याचा अधिकार नाही, असे सांगून हात झटकत आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे ‘मरण’ येत आहे. जिल्हा रूग्णालयात तात्काळ औषधी उपलब्ध करून सर्वसामान्यांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क केला. त्यांनी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले. परंतु त्यानंतर संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी बंद येत होता. तसेच अतिरीक्त जिल्हा शल्यकित्सक डॉ.सतीष हरीदास यांचाही संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली
नाही.
सर्दी, खोकल्याच्या औषधांचाही तुटवडा
मोठ्या आजारांचे तर सोडाच परंतु सर्दी, खोकल्याच्या औषधांसाठी रूग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. तसेच अपघात विभागात आल्यानंतर आलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठीही जिल्हा रूग्णालयाकडे अपुरी यंत्रणा असल्याचे समोर आले आहे. याचा फटका रूग्णांना सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
म्हणे! माध्यमांना माहिती देऊ नका
शासकीय रूग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहचू देऊ नका, त्यांना याबाबत काहीच सांगू नका, अशा सूचना आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य प्रशासनाला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच स्थानिक अधिकारी, कर्मचारी दबावामुळे ही माहिती देण्यास टाळाटाळ करतात.